दीर्घ प्रतीक्षेनंतर विधि विद्यापीठ सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:55 IST2017-10-06T00:54:50+5:302017-10-06T00:55:00+5:30
अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या (एमएनएलयू) २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली.

दीर्घ प्रतीक्षेनंतर विधि विद्यापीठ सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात गुरुवार महत्त्वाचा दिवस ठरला. अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या (एमएनएलयू) २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. देशभरातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक वर्षाचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना शिकविण्यासही सुरुवात झाली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
औरंगाबाद शहरात राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन आघाडी सरकारने केली होती. मात्र मुंबई, नागपूर, पुणे सोडून औरंगाबादेत मंजूर झालेल्या विद्यापीठाला विरोध होऊ लागला. यातून मुंबई, नागपूर येथेही विधि विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय झाला. मात्र अगोदर घोषणा झालेल्या औरंगाबादपूर्वीच मुंबई आणि नागपूर येथील विधि विद्यापीठाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. यात औरंगाबाद येथे स्थापन करण्यासाठी हालचाल सुरू झालेली ‘आयआयएम’ संस्था नागपूरला पळविण्यात आली. यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका सुरू झाली. याचा परिणाम एमएनएलयू स्थापन होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. एमएलएलयूच्या कुलपती सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची नेमणूक करण्यात आली. यानंतर ६ मार्च रोजी डॉ. एस. जी. गुप्ता यांची विद्यापीठाच्या ओएसडीपदी निवड झाली. तर १६ मार्च रोजी कुलगुरूपदी डॉ.एस.सूर्यप्रकाश यांची नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत दोन्ही अधिकाºयांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन विद्यापीठाला आवश्यक असलेल्या सर्व सेवा राज्य सरकारच्या मदतीने उपलब्ध करून घेऊन गुरुवारपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात केली आहे. औरंगाबाद शहरातील शैक्षणिक क्षेत्रात या विद्यापीठामुळे नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे.
न्यायमूर्तींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत
विधि विद्यापीठात पहिल्याच वर्षी बी.ए.एलएल.बी. या पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. या पहिल्या बॅचसाठी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील ८ तर उर्वरित विद्यार्थी हे इतर राज्यांतील आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, न्यायमूर्ती दिनेश गंगापूरवाला, कुलगुरू डॉ. एस. सूर्यप्रकाश, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि बी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजीवनी मुळे मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलताना न्यायमूर्ती बोर्डे म्हणाले, शहरातील विधि शिक्षणासंबंधी वेगळे वातावरण आहे. विधि क्षेत्रात करिअर करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असून, याठिकाणी उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती गंगापूरवाला म्हणाले, विद्यार्थ्यांनी पुस्तकी अभ्यासाच्या पुढे जाऊन अभ्यास केला पाहिजे. देशभर गाजत असलेल्या रोहिग्यांच्या सारख्या प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असेही त्यांनी सांगितले.