२६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार; पालकमंत्री संजय शिरसाट
By बापू सोळुंके | Updated: January 20, 2025 19:30 IST2025-01-20T19:26:44+5:302025-01-20T19:30:16+5:30
शहर आणि ग्रामीणमधील गुन्हेगारी रोखण्यास आपले प्राधान्य असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी नमूद केले.

२६ जानेवारीनंतर डीपीसीतील चुकीची कामे रद्द करणार; पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा नियोजन समितीने समान निधी वाटप केला नाही, शिवाय काही चुकीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचे कळाले आहे, जनतेच्या पैशांचा असा अपव्यय होऊ देणार नाही. २६ जानेवारीनंतर डीपीसीची काही चुकीची कामे रद्द करणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीची कामे काही ठेकेदारांनी रिंग करून मिळविल्याची माहिती आहे. या ठेकेदारांवर गुन्हे नोंदविण्याचा आपला मानस आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीणमध्ये १० हजार बांगलादेशी नागरिक असल्याचा तसेच यातील सर्वाधिक सिल्लोड मतदारसंघात असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याकडे लक्ष वेधले असता शिरसाट यांनी नमूद केले की, काही लोक नकली आधारकार्ड आणि मतदारकार्डही तयार करून देतात. यामुळे बांगलादेशी नागरिकांना मदत होते. बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी शहरात आणि ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. खा. संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्त्वाखाली २० आमदार शिवसेनेतून बाहेर पडणार असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर त्यांनी आम्ही एकसंध आहोत, राऊत यांनी उगाच आमच्या पक्षात नाक खुपसू नये, अशा शब्दात पलटवार केला.
पोलिसांना २० नवीन स्कार्पिओ जीप
शहर आणि ग्रामीणमधील गुन्हेगारी रोखण्यास आपले प्राधान्य असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी नमूद केले. आजकाल पोलिसांपेक्षा गुन्हेगारांकडे उच्च दर्जाची वाहने असतात. यामुळे गुन्हेगारांचा पाठलाग करणे पोलिसांना शक्य होत नाही. ही बाब निदर्शनास आल्याने शहरातील पोलिसांना २० नवीन स्कार्पिओ जीप देणार असल्याचे पालकमंत्री शिरसाट यांनी सांगितले.
२३ जानेवारीपूर्वी माजी नगरसेवकांचा प्रवेश
शहरातील दहापेक्षा अधिक माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. २३ जानेवारीपूर्वी हे प्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.