छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून यापूर्वी मुंबईसाठी सुटणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आधी जालना आणि नंतर हिंगोलीपर्यंत नेण्यात आली. आता जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरहून नव्या रेल्वे सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागत असताना, आहे त्या रेल्वे पळविल्या जात असल्याची ओरड प्रवासी, रेल्वे संघटनांतून होत आहे.
गतवर्षी डिसेंबरमध्ये जालना-मुंबई मार्गावर मराठवाड्यातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली. पहाटेची वेळ आणि आरामदायक सुविधेमुळे या रेल्वेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र अवघ्या वर्षभरातच आता ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दोन महिन्यांत २९ हजार प्रवासी, १७ हजार शहरातूनजानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ या दोन महिन्यांत जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने २९,५१५ प्रवाशांनी प्रवास केला. यात १७,२२० प्रवाशांनी छत्रपती संभाजीनगरहून प्रवास केला.
विस्ताराला आमचा तीव्र विरोधएक्स्प्रेसच्या नांदेडपर्यंतच्या प्रस्तावित विस्ताराला आमचा तीव्र विरोध आहे. तसे झाल्यास या रेल्वेचे सध्याचे वेळापत्रक विस्कळीत होईल. छत्रपती संभाजीनगरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होईल. नांदेडहून वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी असल्यास वेगळी रेल्वे सुरू करावी. यासंदर्भात रेल्वेमंत्री आणि रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी- टूरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)
रेल्वेचा विस्तार नकोयापूर्वी जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार करण्यात आला. आता वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार होता कामा नये.- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
नांदेडला स्वतंत्र रेल्वे द्यावंदे भारत एक्स्प्रेसचे ८० टक्क्यांहून अधिक प्रवासी हे छत्रपती संभाजीनगरहून आहेत. छत्रपती संभाजीनगरसाठी स्वतःच्या वंदे भारत एक्स्प्रेसची गरज अधोरेखित होते. असे असताना प्रवाशांच्या सोयीचा कोणताही विचार न करता केवळ मनात आले म्हणून ही रेल्वे नांदेडपर्यंत विस्तार करण्याचा घाट घातला जात आहे. नांदेडला हवी असल्यास स्वतंत्र एक्स्प्रेस द्यावी.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक