पित्यानंतर लेकीचाही सन्मान !

By Admin | Updated: October 30, 2014 00:28 IST2014-10-29T00:23:50+5:302014-10-30T00:28:10+5:30

प्रताप नलावडे ,बीड राज्याच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडे यांचा सामावेश जवळपास निश्चित मानला जात असून जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी असेल,

After the honor of Leki! | पित्यानंतर लेकीचाही सन्मान !

पित्यानंतर लेकीचाही सन्मान !


प्रताप नलावडे ,बीड
राज्याच्या मंत्रीमंडळात पंकजा मुंडे यांचा सामावेश जवळपास निश्चित मानला जात असून जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी असेल, याची उत्सुकता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आजवर त्यांचे नाव होते. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे पंकजा यांच्याकडे महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात येईल, असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बोलताना व्यक्त केला.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांनी पक्षात आपले स्वत:चे स्थान निर्माण केले असून पक्षीय पातळीवरही त्यांच्या निवडणुकीतील कामगिरीची दखल घेतली जाईल, या विश्वासाने जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी शपथविधीसाठी मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातून मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार असल्याचेही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा आता पंकजा सांभाळत आहेत. पुन्हा संघर्ष यात्रा काढून त्यांनी पक्षीय पातळीवरही निर्णयात्मक कामगिरी बाजवली आहे.जिल्ह्यातील भाजपाचा एकहाती विजय पंकजा यांनीच मिळविला. त्यांचा कॅबिनेटमंत्री म्हणून समावेश झाल्यानंतर जिल्ह्याला पाचव्यांदा कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. यापूर्वी स्वत: मुंडे यांच्यासह जयदत्त क्षीरसागर, सुंदरराव सोळंके, आणि विमल मुंदडा यांना कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. शिवाय मुंदडा यांच्यानंतर त्या जिल्ह्यातील दुसऱ्या महिला मंत्री ठरतील.
ओबीसीचे नेतृत्व आता त्यांच्याकडे आले आहे. आपल्या सोबत ओबीसी समाज असल्याचे त्यांनी विधानसभा निवडणुकीतही दाखवून दिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर निर्माण झालेली पोकळीही त्यांनी भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अनुकंपा तत्वाने राजकारणात कोणतेही पद आपल्याला नको आहे, असे सांगत पंकजा यांनी स्वत:चे नेतृत्व सिध्द केल्यामुळे त्यांचा मंत्रीमंडळातील समावेश निश्चित मानला जात आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. जिल्ह्याचे राजकारणही त्यांच्या भोवतीच कायम फिरत राहिले होते. पंकजा यांना कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांना हे आव्हानही पेलावे लागणार आहे.
वारसा, सहानुभुती, पक्षातील त्यांचे स्थान, ओबीसीचे नेतृत्व अशा अनेक बाबी त्यांच्यासाठी सकारात्मक आहेत. आता जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे ती केवळ त्यांच्याकडे दिल्या जाणाऱ्या खात्याची.
गेवराईमध्ये दोन विद्यमान आमदारांना टक्कर देऊन विधानसभेत धडक मारणाऱ्या भाजपाच्या अ‍ॅड़ लक्ष्मण पवार यांच्याकडेही पक्ष मोठी जबाबदारी सोपू शकतो, अशी दाट शक्यता आहे़
अ‍ॅड़ पवार हे अडीच वर्षांपूर्वी भाजपात डेरेदाखल झालेले आहेत़ अडचणीच्या काळात त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांना मोलाची मदत केलेली आहे़ गेवराई नगर पालिकेवर ‘होल्ड’ असलेल्या अ‍ॅड़ पवार यांचे वडील माधवराव पवार हे एकेकाळी आमदार होते़ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे बदामराव पंडित यांच्याशी त्यांची लढाई झाली़ अमरसिंह पंडित हे बदामरावांच्या सोबत होते़ पालिका वगळता इतर सर्व सत्तास्थाने ताब्यात असलेल्या दोन्ही पंडितांना पराभवाची धूळ चारून अ‍ॅड़ पवार विक्रमी मतांनी निवडून गेले़ सुमारे ६० हजार १ मतांनी त्यांनी आमदारकीवर स्वत:चे नाव कोरले़ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मते घेऊन विधानसभेत जाण्याचा मान त्यांनाच मिळाला आहे़ त्यामुळे पक्षाकडून त्यांना राज्यमंत्रिमंडळात संधी मिळू शकते अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे़ गेवराई तालुक्यात या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे़
दरम्यान, कालपर्यंत आष्टीचे आमदार भीमराव धोंडे यांचे नावही चर्चेत होते़ मात्र आता पवारांचे नाव पुढे आले आहे़

Web Title: After the honor of Leki!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.