भाजपा पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतरच आघाडी

By Admin | Updated: May 3, 2015 00:58 IST2015-05-03T00:56:21+5:302015-05-03T00:58:56+5:30

उस्मानाबाद : जिल्हा बँक बिनविरोध निघावी, ही संकल्पना मांडून त्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले.

After the debate of BJP, the alliance | भाजपा पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतरच आघाडी

भाजपा पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतरच आघाडी



उस्मानाबाद : जिल्हा बँक बिनविरोध निघावी, ही संकल्पना मांडून त्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, त्यात यश आले नाही. त्यानंतर बँकेचे हित लक्षात घेवून भाजपाला सोबत घेवून निवडणूक लढण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. त्यानुसार पॅनलही निश्चित झाले आहे. ही सर्व प्रक्रिया भाजपा पक्षश्रेष्ठीसोबत झालेल्या चर्चेनुसार झाली आहे. वरिष्ठांनी बँक निवडणूकीसंदर्भातील सर्व अधिकार जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांना दिले आहेत. त्यामुळे इतर मंडळी काय म्हणते याला फारसे महत्व देण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे म्हटले आहे.
दुधगावकर व इतर मंडळी माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांचे विरोधक म्हणून राजकारणात राहण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहेत. ही मंडळी काँग्रेसचे हस्तक म्हणून काम करीत असल्याचे जिल्हयातील जनतेला ज्ञात असल्याचे सांगत, पत्रकारपरिषद घेवून केलेल्या आरोपातून याला एकप्रकारे पुष्टीच मिळाल्याचे बिराजदार यांनी या पत्रकात म्हटले आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेला निधी मिळवून देण्याचे अनेकदा प्रयत्न केले. परंतु, काँग्रेस पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री, सहकारमंत्री आणि पालकमंत्र्यांनी जाणीवपूर्वक बँकेला मदत मिळू दिली नसल्याचा आरोपही बिराजदार यांनी या पत्रकात केला आहे. राज्यातील भाजपाचे सरकार उस्मानाबाद व बीड या दोन्ही जिल्हा मध्यवर्ती बँकांना विशेष मदत करणार आहे. त्यामुळेच आम्ही एकत्रित येऊन जिल्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देवू असा विश्वासही बिराजदार यांनी या पत्रकात व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
संजय पाटील दुधगावकर हे फेब्रुवारी २०१२ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर अंबेजवळगा जिल्हा परिषद गटातून निवडून आले. २०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात भाजपाच्या तिकीटावर लढविली. यात त्यांचा दारूण पराभव झाला. भाजपाच्या तिकिटावर विधानसभा लढविल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून मिळविलेल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा त्यांनी आजपर्यंत राजीनामा का दिला नाही? असा सवाल करीत, एवढे सौजन्य नसलेल्या व्यक्तीकडून फार अपेक्षा करणे योग्य नसल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: After the debate of BJP, the alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.