मृत्यूनंतरही ‘रुद्र’ देणार जगाला ज्ञान!

By Admin | Updated: October 31, 2016 00:45 IST2016-10-31T00:38:29+5:302016-10-31T00:45:22+5:30

औरंगाबाद वाळूज बजाजनगर परिसरातील पाच वर्षाच्या चिमुकल्याने अचानक या जगातून निरोप घेतला

After death, 'Rudra' gave knowledge to the world! | मृत्यूनंतरही ‘रुद्र’ देणार जगाला ज्ञान!

मृत्यूनंतरही ‘रुद्र’ देणार जगाला ज्ञान!

संतोष हिरेमठ औरंगाबाद
वाळूज बजाजनगर परिसरातील पाच वर्षाच्या चिमुकल्याने अचानक या जगातून निरोप घेतला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला; मात्र पोटच्या गोळ्याच्या मृत्यूचे दु:ख बाजूला ठेवून डॉक्टर असलेल्या माता-पित्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) त्याचे देहदान करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला. मृत्यूनंतरही हा चिमुकला आपल्या देहाच्या माध्यमातून जगाला वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान देण्याचे कार्य करणार आहे.
आजारपणामुळे रुद्र प्रदीप देशमुख (५) असे या जगातून मंगळवारी अचानक निरोप घेतलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. मुलाच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंब दु:खात बुडाले. परंतु अशा कठीण प्रसंगीही त्यांनी स्वत:ला सावरत एक मोठा निर्णय घेतला. रुद्रचे आयुष्य सार्थकी लागावे आणि त्याच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात योगदान देण्यासाठी त्यांनी त्याचा देह घाटी रुग्णालयास दान करण्याचा निश्चय केला. एक आई-वडील म्हणून अनेकांना असा निर्णय घेणे अवघड होईल. परंतु रुद्र्रच्या आई-वडिलांनी आपल्या भावना सावरत आपल्या चिमुकल्याचे देहदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. देहदानासाठी कुटुंबीय, नातेवाईकांचेही त्यांना पाठबळ मिळाले.
वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी शरीररचनेचा अभ्यास आवश्यक असतो. त्यासाठी देह उपलब्ध होणे महत्त्वाचे ठरते. रक्तदान, नेत्रदानाबरोबर देहदान ही संकल्पना समाजात हळूहळू रुजू लागली आहे. घाटी येथे विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यात येते. एमबीबीएस, बीडीएस आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्षाला किमान २० मानवी मृतदेहांची आवश्यकता असते. समाजामध्ये देहदानाविषयी जनजागृती होण्यासाठी घाटीतील शरीररचनाशास्त्र विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात. देहदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक समिती कार्यरत आहे. मागील काही वर्षांत देहदानाच्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु लहान मुलांचे देहदान क्वचितच घडते. पाचवर्षीय चिमुकल्याचे देहदान वैद्यकीय इतिहासात आणि वैद्यकीय शिक्षणासाठी, संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरले.

Web Title: After death, 'Rudra' gave knowledge to the world!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.