बालिकेच्या मृत्यूनंतर घाटीत तणाव, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:43 IST2016-10-20T01:16:39+5:302016-10-20T01:43:21+5:30
औरंगाबाद : थंडीताप आल्याने दोन दिवसांपासून घाटीत उपचार घेत असलेल्या ११ वर्षीय बालिकेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप

बालिकेच्या मृत्यूनंतर घाटीत तणाव, डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
औरंगाबाद : थंडीताप आल्याने दोन दिवसांपासून घाटीत उपचार घेत असलेल्या ११ वर्षीय बालिकेचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी करून डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे काही काळ घाटीत तणाव निर्माण झाला होता. घाटी प्रशासनाने चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक शांत झाले.
मोनाली सुनील दाभाडे (११,रा. नंदनवन कॉलनी) असे मरण पावलेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मोनालीची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी तिला सोमवारी घाटीतील बालरोगशास्त्र विभागात दाखल केले. उपचारासाठी मोनाली स्वत: चालत वॉर्डात गेली होती.
वॉर्ड क्रमांक २५ मध्ये तिला दाखल करण्यात आले. या विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांचे सहकारी हे तिच्यावर उपचार करीत होते. डॉक्टरांच्या सांगण्यावरून नातेवाईकांनी तिची डेंग्यू तपासणी खाजगी प्रयोगशाळेतून करून आणली. प्र्रयोगशाळेच्या अहवालात तिला डेंग्यू नसल्याचे नमूद करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी मोनालीची प्राणज्योत मालवली. हसत खेळत असलेली मोनाली सकाळी शुद्धीवर होती, असे असताना ती मरण पावल्याचे ऐकून नातेवाईकांना धक्काच बसला. डॉ. प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यानेच मोनाली दगावली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यानंतर नातेवाईकांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांना घेराव घातला. या घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख सलीम पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.