आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे
By Admin | Updated: April 8, 2017 00:21 IST2017-04-08T00:19:19+5:302017-04-08T00:21:51+5:30
जालना : नगर परिषद वाहन चालक व कर्मचारी संघटनेने पुकारलेला संप दोन दिवसांच्या आंदोलनानंतर मागे घेण्यात आला

आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे
जालना : नगर परिषद वाहन चालक व कर्मचारी संघटनेने पुकारलेला संप दोन दिवसांच्या आंदोलनानंतर मागे घेण्यात आला. नगर पालिका प्रशासनाने काही अटी व शर्र्तीवर मागण्या मान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. बुधवारपासनू पालिका कर्मचारी संपावर गेले होते.
पहिल्या दिवशी मागण्यांबाबत ठोस चर्चा न झाल्याने गुरूवारी व शुक्रवारी संप सुरूच होता. शुक्रवारी दुपारी एक वाजता संघटनेचे अध्यक्ष राजाराम गायकवाड यांच्यासह पंधरा ते वीस कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत व शिवसेनेचे गटनेते विष्णू पाचफुले यांनीही मध्यस्थी करून संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. संघटनेचे अधिकारी राजाराम गायकवाड यांनी मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
त्यात सहाव्या वेतन आयोगाची थकित रक्कम फक्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सात हजार रूपयांची रक्कम देण्यात येणार आहे. उर्वरित प्रश्न पालिकेचा ऐच्छिक असल्याचे खांडेकर म्हणाले. त्यासोबतच कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय बिल तसेच घरकुलाचा प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.
मासिक वेतनातून प्रतिमाह तीस रूपये जमा करण्याच्या मागणीबाबत पालिका तसे करू शकत नसल्याचे खांडेकर यांनी स्पष्ट केले.
महसुलातून जमा होणारी रक्कम कशी खर्च करायची याबाबत पालिकेला कोणाची संमती घेण्याची गरज नाही. त्यामुळे या मागण्या मंजूर करण्यात आलेल्या नाहीत. जर कर वसुली चांगली झाल्यास सहाव्या वेतन आयोगाची रक्कम सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना देऊ असेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)