छत्रपती संभाजीनगर : दोन्ही कुटुंबांचे अवघ्या १०० मीटर अंतरावर घर. दोघांचा किराणा दुकानाचा व्यवसाय. मात्र, निमोणे कुटुंबाचा वाळू, जेसीबी, पाण्याच्या टँकर व्यवसायात जम वाढला होता . राजकीय पाठबळामुळे गुंडगिरीचा आत्मविश्वास वाढला होता. पाेलिस, मनपा, सिडकोकडे तक्रारींनंतरही त्यांनी पाडसवान कुटुंबाला मारहाण व धमकावणे सुरूच ठेवले. दोन वर्षांचे वाद अखेर प्रमोद पाडसवान यांच्या हत्येपर्यंत येऊन थांबले. शुक्रवारी दुपारी १ वाजता संभाजी कॉलनीत घडलेल्या या हत्येनंतर गुंडगिरीच्या वाढलेल्या आत्मविश्वासाला कारणीभूत प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करण्यात आला.
रमेश पाडसवान (६०) यांनी घरासमोरील सिडकोची अतिरिक्त जमीन (ऑडशेप प्लॉट) विकत घेतल्यापासून आरोपी ज्ञानेश्वर निमोणे, त्याचे जुळे भाऊ गौरव व सौरव, वडील काशीनाथ येडू निमोणे, आई शशिकला व जावई मनोज दानवे सातत्याने वाद घालत होते. २०२४ मध्ये निमोणे बंधूंनी गणेशोत्सवात पाडसवान कुटुंबाला मारहाण केली होती. वादाची तक्रार पोलिसांकडे गेली, मात्र त्याचा कुठलाच परिणाम झाला नाही. अखेर पाडसवान कुटुंबावर हल्ला चढवून प्रमोद यांची हत्या करण्यात आली. मात्र, कोणीही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
वडिलांना वाचविण्यासाठी मुलाचा आटोकाट प्रयत्नघटनेत प्रमोद यांचा १७ वर्षीय मुलगा रुद्राक्षही गंभीर जखमी झाला. स्वत:चा हात, खांद्यावर गंभीर वार होत असताना वडील व आजोबांना दुचाकीवरून रुग्णालयात नेण्यासाठी तो उठून तयार झाला होता.
आईने भडकावले, हातात चाकू सोपवलाप्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, निमोणे भावांनी, ’आज कोणालाच जिवंत सोडायचे नाही, यांचा खेळच संपवून टाकू’ असे म्हणत पाडसवान कुटुंबावर हल्ला चढवला. प्रमोद, रमेश यांच्या पाठीसह तब्बल ११ ठिकाणी खोलवर वार केले. नातवालाही सोडू नका म्हणत रुद्राक्षवरही हल्ला केला. शशिकलाने सौरवच्या हातात चाकू देत 'सर्वांना डोळे, तोंड दाबून मारून टाका', असे ओरडून भडकावले.
सातपेक्षा अधिक तक्रारीप्रमोद यांच्या काकाच्या आरोपानुसार, निमोणे कुटुंबाविरोधात सिडको, मनपासह पोलिसांकडे ७ पेक्षा अधिक तक्रारी केल्या. काही महिन्यांपूर्वी त्यांचे पत्र्याचे शेड काढून साहित्यही जप्त झाले होते. निमोणे त्याच्या २ चारचाकी, प्लॉटवर उभ्या करण्यावरूनही वाद घालत होते. राजकीय पाठबळाचा वापर करत निमोणे कुटुंबीयांनी मनपाने जप्त केलेले साहित्य परत मिळवत पुन्हा प्लॉटवर उभे केले.
राजकीय पाठबळ, नेत्यांमध्ये ऊठबसऔद्योगिक वसाहतीत पाण्याचे टँकर, जेसीबी पुरविण्याचा व्यवसाय असलेले निमोणे बंधू एका राजकीय पदाधिकाऱ्याचे समर्थक आहेत. त्याच आधारावर ३ वर्षांपूर्वी शिवराज क्रीडा मंडळ स्थापन केले. मंडळाचे कारण करत प्लॉट हडपण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच्यावर देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमरे लावले होते. ६ दिवसांपूर्वीच ज्ञानेश्वरचा साखरपुडा झाला होता.
पाडसवान कुटुंब शांत, अनेक संकटे२५ वर्षांपासून वास्तव्यास असलेले पाडसवान कुटुंंब शांत स्वभावाचे आहे. हत्या झालेल्या प्रमोद यांच्या मोठ्या मुलीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. या दु:खातून ते सावरत असतानाच निमोणे कुटुंबाने त्यांच्यासोबत नाहक शत्रुत्व घेतले. बी. फार्मसीची पदवी घेतलेल्या प्रमोद यांनी औषधीनिर्मितीचा व्यवसाय सुरू केला होता. कुटुंबावर वारंवार येणाऱ्या संकटांमुळे तो थांबवून ते किराणा व्यवसायात उतरले. शिवराय, श्री ट्रेडिंग कंपनी नावाने घरगुती होलसेल साहित्य विक्रीचा व्यवसायही सुरू केला होता.
तिघे ताब्यात, तिघे रुग्णालयातघटनेनंतर सिडकोचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहायक निरीक्षक योगेश गायकवाड, उपनिरीक्षक निवृत्ती गायके, अनिल नानेकर, सुभाष शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेत गौरव निमोणेच्या डोक्यात दगड लागून टाके पडले. पोलिसांनी तत्काळ सौरभ, जावई मनोज, वडील काशीनाथला ताब्यात घेतले. गौरव, ज्ञानेश्वर, शशिकला यांना रात्री ताब्यात घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.