अखेर ‘त्या’ तारा रहिवाशांच्या घरावर
By Admin | Updated: August 22, 2014 01:00 IST2014-08-22T00:21:03+5:302014-08-22T01:00:25+5:30
बीड : शहरातील हनुमान नगर, नाथ नगर या परिसरात विद्युत तारा रहिवाशांच्या घरावर आल्या होत्या. यासंदर्भात वारंवार मागणीही केली होती. तसेच ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते.

अखेर ‘त्या’ तारा रहिवाशांच्या घरावर
बीड : शहरातील हनुमान नगर, नाथ नगर या परिसरात विद्युत तारा रहिवाशांच्या घरावर आल्या होत्या. यासंदर्भात वारंवार मागणीही केली होती. तसेच ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. यानंतरही सदरील तारा दुरुस्त करण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केली. परिणामी बुधवारी झालेल्या वाऱ्या-पावसात या तारा तुटल्या व नागरिकांच्या घरावर पडल्या. नागरिकांनी सावधगिरी बाळगल्याने सुदैवाने काही हानी टळली.
बीड शहरातील हनुमान नगर, नाथ नगर, बार्शी नाका, शाहुनगर, शनि मंदिर गल्ली आदी भागात नागरिकांच्या घराजवळून विद्युत तारा गेलेल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे अनेक ठिकाणी या तारा घरांना चिकटलेल्या आहेत. काही ठिकाणी सावधगिरी म्हणून केवल छोटासा पाईपचे या तारांना आवरण घातलेले आहे. यामुळे काही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सदरील तारा घरापासून दूर करण्याची मागणी नागरिकांतून वारंवार होत आहे.
असे असतानाही याची दखल वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांतून घेतली जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या व्यथा ‘लोकमत’ने ८ आॅगस्ट रोजी मांडल्या होत्या.
यानंतरही सदरील तारा दुरुस्त करण्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. परिणामी बुधवारी सायंकाळी झालेल्या वाऱ्यासह पावसाने या तारा तुटल्या.
अनेक ठिकाणच्या तारा तुटून त्या नागरिकांच्या घरावर तर कोठे घरामध्ये, रस्त्यावर पडल्या. सदरील प्रकार वेळीच रहिवाशांच्या लक्षात आल्याने अनुचित घटना टळली. यानंतरतरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी भागवत वाघमारे, पद्मीण बामणे, महादेव लाड, भागवत डोईफोडे, महादेव बनसोडे, किशोर लोखंडे यांनी केली आहे.
तारा दुरुस्त करू-लटपटे
या संदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे म्हणाले की, मी मुंबई येथे आहे, काय प्रकार झाला आहे, याची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतो. विद्युत तारा नागरिकांच्या घरावर तुटल्या असतील तर त्या तात्काळ दुरुस्त केल्या जातील, असेही ते म्हणाले.
आता आंदोलन करणार
तारा हटविण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यासाठी आता आंदोलन करणार असल्याचे सुनीता बनसोडे, हरिबाई बामणे, प्रियंका वाघमारे, पद्मीण वाघमारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)