अखेर ‘त्या’ प्रकरणातील लिपिकावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 11, 2017 00:10 IST2017-04-11T00:08:00+5:302017-04-11T00:10:25+5:30
लातूर :बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ लिपीक चंद्रकांत जाधव याच्याविरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला

अखेर ‘त्या’ प्रकरणातील लिपिकावर गुन्हा दाखल
लातूर : बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील कनिष्ठ लिपीक लोभा गणेश कांबळे (३६) यांनी प्रशिक्षण केंद्रातील वरिष्ठ लिपीकासह वरिष्ठांच्या छळाला कंटाळून गुरूवारी दुपारी उपप्राचार्यांच्या दालनातच विषारी द्रव घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ अखेर या प्रकरणी पाचव्या दिवशी सोमवारी सायंकाळी वरिष्ठ लिपीक चंद्रकांत जाधव याच्याविरोधात विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रमुख लिपीक म्हणून चंद्रकांत जाधव हे कार्यरत आहेत़ त्यांच्याकडून आपल्याला २००९ पासून सातत्याने छळ होत असल्याची तक्रार महिला लिपीक श्रीमती लोभा गणेश कांबळे (३६, रा़ प्रकाशनगर, लातूर) यांनी १३ जानेवारी २०१७ रोजी पोलीस महासंचालकाकडे केली होती़ या प्रकरणात छळणाऱ्या संबंधित प्रमुख लिपिकाची चौकशी न करता उलट चौकशीच्या नावाखाली आपलाच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ केला जात आहे़ शिवाय, या प्रकरणात आपल्याला न्याय मिळणार नाही, या नैराश्यातून लोभा कांबळे यांनी बाभळगावातील प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्यांच्या दालनातच गुरूवारी विषारी द्रव घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्रारंभी शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचाासाठी दाखल केले होते. सध्याला त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी सोमवारी दुपारी श्रीमती लोभा कांबळे यांच्या जबाबावरुन वरिष्ठ लिपीक चंद्रकांत जाधव याच्यावर अखेर विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात सायंकाळी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोनि. सुनील ओव्हळ यांनी दिली.(प्रतिनिधी)