१९ वर्षानंतर कळंबमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा
By Admin | Updated: October 23, 2014 00:15 IST2014-10-23T00:02:30+5:302014-10-23T00:15:07+5:30
बालाजी आडसूळ , कळंब उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे.

१९ वर्षानंतर कळंबमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा
बालाजी आडसूळ , कळंब
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील राणाजगजितसिंह पाटील यांचा विजय अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे. राष्ट्रवादीच्या या विजयाने राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. परंडा, उमरगा या मतदारसंघातून शिवसेना आणि राष्ट्रवादीने आजवर आलटून-पालटून यश मिळविले आहे. मात्र कळंबमध्ये ‘कळंब तालुका म्हणजेच सेना’ असे समीकरण निर्माण झाले होते.१९ वर्षानंतर हे चक्र भेदण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली आहे.
१९९५ आणि १९९९ अशी दहा वर्षे येथून सेनेच्या कल्पनाताई नरहिरे यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर २००४ साली सेनेचेच दयानंद गायकवाड निवडून आले. त्यानंतर २००९ मध्ये ओम राजेनिंबाळकर यांनी येथे सेनेचा भगवा फडकाविला होता. म्हणजेच मागील १९ वर्षापासून कळंब तालुक्यावर शिवसेनेचे वर्चस्व होते. पक्षश्रेष्ठींनी उमेदवार जाहीर केला की त्याला निवडून आणण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक राहायची. मात्र यावेळी हे समीकरण राष्ट्रवादीने मोडित काढले. मागील पाच वर्षात राखलेला दांडगा जनसंपर्क आणि विकास कामांसाठीचा पाठपुरावा यामुळेच हे यश मिळाले.
तालुक्यातील ५५ गावामधून वरचढ ठरत राष्ट्रवादी काँग्रेसला येथून सहा हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. भाजपाची व्होट बँक असलेल्या गावात संजय पाटील दूधगावकर यांची निराशा झाली असली तरीही त्यांना १३ हजार मते या तालुक्यातून मिळाली आहेत. तर अर्धे मतदान असलेल्या वीस पेक्षा जास्त मोठ्या गावात सेनेची पिछाडी झाली असून, शहरी आणि ग्रामिण अशा सर्वच भागातून राष्ट्रवादीला पाठींबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारादरम्यान गावागावत चुरस होती. त्यामुळे निकालानंतर गावपातळीवरील अनेक कार्यकर्त्यांचे कर्तृत्वही उघड झाले आहे.
कळंब शहरातील १८८४४ मतदारापैकी १०९४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. न.प.मध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने याकडे कोण सरस होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होेते. शहरातही प्रमुख उमेदवारांनी चांगलीच ताकद पणाला लावली होती. परंतु कळंबमध्ये राकॉला सर्वाधिक ४४७६ त्याखालोखाल, सेनेला ३२१०, भाजपला १८९१ तर काँग्रेसला ४६२ मते मिळाली. अत्यंत प्रतिष्ठेचा विषय बनलेल्या शहरात राकाँला साडेबाराशे मतांची निर्णायक आघाडी मिळाली. याठिकाणी शिवसेनेचे गणित मतदारांनी बिघडवून टाकले तर आपली आहे ती संघटनशक्ती पूर्ण क्षमतेने वापरून राकाँने कळंबमध्ये मताधिक्य मिळविले आहे.