आपेगावला नवीन पूल होणार
By Admin | Updated: November 27, 2014 01:09 IST2014-11-27T00:54:48+5:302014-11-27T01:09:55+5:30
पैठण : बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री या गावांना जोडणारा २९० मीटर लांबीचा पूल ८ नोव्हेंबर रोजी खचला होता.

आपेगावला नवीन पूल होणार
पैठण : बेसुमार वाळू उपशामुळे गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री या गावांना जोडणारा २९० मीटर लांबीचा पूल ८ नोव्हेंबर रोजी खचला होता. या पुलाची तपासणी बुधवारी राज्य शासनाने गठित केलेल्या समितीने केली. दुरूस्तीला दहा कोटींचा खर्च येणार असल्याने या पुलाची दुरुस्ती करण्यापेक्षा येथे नवीन पूल उभारण्याचा सूर या समितीचा दिसून आला.
दरम्यान, पुलाच्या शाबूत असलेल्या भागातून किती वाळू उपसा झाला आहे याची तपासणी करा,
असे आदेश या समितीने
स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या समितीचे अध्यक्ष मुख्य अभियंता सी.पी. जोशी यांच्यासह विभागाचे मंत्रालयातील अवर सचिव राम गुढे, दक्षता व गुणनियंत्रक मंडळाचे अधीक्षक अभियंता व्ही.व्ही. कुळकर्णी, संकल्प चित्र विभागाचे अधीक्षक अभियंता ठुबे यांच्या समितीने पुलाची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता वृषाली गाढेकर, उपविभागीय अभियंता एन.बी. चौरे, शाखा
अभियंता जायभाये आदी उपस्थित
होते.
पुलाच्या नवीन बांधकामासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलाची दुरुस्ती करण्यापेक्षा तेथे नवीन पूल उभारणेच योग्य होईल, असा सूर या समितीचा होता. दरम्यान, नवीन पूल बांधताना बंधाऱ्याची उंची व जलसाठा पाणीपातळी विचारात घ्यावी, अशी मागणी या
भागातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
८ नोव्हेंबर रोजी आपेगाव व कुरणपिंप्री यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील २९० मीटर लांबीचा पूल खचला होता. पुलाच्या १२६ कमानींपैकी ४२ कमानी क्षतिग्रस्त झाल्याने पुलावरील वाहतूक बंद पडली होती. बेसुमार वाळू उपसा झाल्याने ८० वर्षे वयोमर्यादा असलेला पूल अवघ्या १२ वर्षांत खचला, असा निष्कर्ष या पुलाची पाहणी केल्यानंतर शासकीय अधिकारी व तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नियुक्त केलेली समिती काय निष्कर्ष काढते, याकडे लक्ष लागले आहे.