कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी नवी जीवनशैली आत्मसात करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:02 IST2021-06-29T04:02:16+5:302021-06-29T04:02:16+5:30
गेस्ट रूम ------- कोरोना, ‘डेल्टा’मुळे खबरदारीची पावले उचलली जात आहेत. पण नागरिकांनी दंड होईल, पावती मिळेल म्हणून मास्क वापरायचा, ...

कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी नवी जीवनशैली आत्मसात करा
गेस्ट रूम
-------
कोरोना, ‘डेल्टा’मुळे खबरदारीची पावले उचलली जात आहेत. पण नागरिकांनी दंड होईल, पावती मिळेल म्हणून मास्क वापरायचा, सोशल डिस्टन्स पाळायचे, असा विचार करू नये. तर मास्क, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर ही नवीन जीवनशैली आहे म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही. कारण कोरोनाने सर्व अंदाज तोडले आहेत. पण नागरिकांना काहीही वेगळे करायचे नाही, जी खबरदारी आजपर्यंत घेतली, तीच यापुढेही घ्यायची आहे.
-------
विषाणू हा डीएनए आणि आरएनए अशा दोन प्रकारचे असतात. कोरोना हा आरएनए व्हायरस आहे. पोलिओदेखील आरएनएन व्हायरस आहे. आरएनए व्हायरस जेव्हा स्वत:ची काॅपी करतो, तेव्हा त्यात बदल होतो. म्हणजे म्युटेशन होते. असे म्युटेशन ०.०००१ टक्केच जगू शकतात. माणसाची रोग प्रतिकारशक्ती वाढते, तेव्हा संसर्ग तेवढा होत नाही, तेव्हा विषाणू एकप्रकारे उत्क्रांती करून स्वत:त बदल करतात.
कोणत्याही वस्तूला वस्तुमान आणि आकारमान असते. तसेच विषाणूत दुसऱ्याला संसर्ग करण्याची शक्ती आणि लागण झालेल्या व्यक्तीला गंभीर करण्याची शक्ती असते. विषाणूत जसा बदल होतो, तसे त्याची संसर्ग शक्ती वाढते. तर गंभीर करण्याची शक्ती कमी होते, असे निरीक्षण आहे. पण कोरोनात काय होईल, हे आताच सांगता येत नाही. आता डेल्टा प्लस आला आहे. त्यामुळे संसर्ग शक्ती, रुग्णाला गंभीर करण्याची शक्ती वाढेल की नाही, हे समोर यायचे आहे.
डेल्टा प्लस आला म्हणजे नागरिकांना काही वेगळे करण्याची गरज नाही. आजपर्यंत जे केले आहे, तेच यापुढेही करायचे आहे. मास्क, सॅनिटायझर, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे आहे. शिवाय उपचारात कोणताही बदल होत नाही.