आरटीईसाठी ३ हजार ६२५ जागांसाठी झाली प्रवेशनिश्चिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:05 IST2021-04-08T04:05:56+5:302021-04-08T04:05:56+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ हजार ६२५ जागांसाठी बुधवारी पुण्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे ...

आरटीईसाठी ३ हजार ६२५ जागांसाठी झाली प्रवेशनिश्चिती
औरंगाबाद : जिल्ह्यातील ६०३ शाळांमधील ३ हजार ६२५ जागांसाठी बुधवारी पुण्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरटीई लॉटरीची सोडत काढण्यात आली. लॉटरीत प्रवेशनिश्चिती झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून मेसेज पाठविण्यास सुरुवात होणार असल्याचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.
आरटीईसाठीच्या ३ हजार ६२५ जागांसाठी ३० मार्चपर्यंत ११ हजार ८६१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर अर्ज केलेल्या पालकांचे सोडतीकडे लक्ष लागले होते. बुधवारी पुण्यात सोडत पार पडली. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवेदनपत्रासोबत सादर केलेल्या मोबाईल नंबरवरील मेसेज नियमितपणे तपासावेत. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्राप्त मेसेजनुसार कागदपत्रे पडताळणी व प्रवेशाबाबतची इतर कार्यवाही मुदतीत पूर्ण करावी. तसेच मुदतीनंतर प्रवेशाबाबतची कार्यवाही स्थानिक स्तरावरून होणार नसल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.