तेरणा कारखान्यावर अखेर प्रशासक

By Admin | Updated: February 11, 2015 00:27 IST2015-02-11T00:24:35+5:302015-02-11T00:27:09+5:30

उस्मानाबाद : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे

Administrator at Titer Factory | तेरणा कारखान्यावर अखेर प्रशासक

तेरणा कारखान्यावर अखेर प्रशासक


उस्मानाबाद : विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून कारखान्यावर प्रशासक म्हणून सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
साखर सहसंचालकांनी याबाबत जारी केलेल्या आदेशात कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने कामकाजात काही कसूर केल्याचे सकृतदर्शनी आढळून येत असल्याचे नमूद केले आहे. यामध्ये गाळप क्षमतेचा अपुरा वापर केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. याबरोबरच महाराष्ट्र साखर कारखाने अधिनियम १९८४ मधील तरतुदीनुसार प्रत्येक साखर कारखान्याने ऊस गाळप करण्यासाठी साखर आयुक्तालयाकडून रितसर गाळप परवाना प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. परंतु, सन २०१२-१३ मध्ये कारखान्याने गाळप हंगाम घेतला नाही. त्यानंतर २०१३-१४ करिता गाळप परवाना मागणी प्रस्ताव सादर करण्याची निर्धारित मुदत ३० सप्टेंबर २०१३ संपल्यानंतर १३ जानेवारी रोजी २०१४ रोजी कारखान्याने पाठविलेला गाळप परवाना मागणी प्रस्ताव प्राप्त नमूद केले आहे. त्यामध्येही १८ त्रुटी होत्या. सदर त्रुटींची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कारखान्याने या त्रुटींची पूर्तताही केली नसल्याचे सहसंचालकांनी याबाबतच्या आदेशात नमूद केले आहे.
याबरोबरच गाळप हंगाम २००९-१० मध्ये ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे देय असलेल्या ऊस दराच्या रक्कमेपोटी कारखान्याविरूद्ध रूपये १५३.०० लाखाचे महसुली बाकी वसुली प्रमाणपत्र मिळण्याकरिता प्रस्ताव या कार्यालयामार्फत पाठविण्यात आला असून सदर प्रकरणी पडताळणीसाठी विशेष लेखा परिक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (साखर) उस्मानाबाद यांना कारखान्याने रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नसल्याचेही साखर सहसंचालकांनी या आदेशामध्ये नमूद केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Administrator at Titer Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.