सेनगाव बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ
By Admin | Updated: July 3, 2014 00:23 IST2014-07-02T23:54:45+5:302014-07-03T00:23:47+5:30
सेनगाव : सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर २ जुलैै रोजी प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली

सेनगाव बाजार समितीवर प्रशासकीय संचालक मंडळ
सेनगाव : सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर २ जुलैै रोजी प्रशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून, मुख्य प्रशासकपदी नारायण खेडेकर यांच्यासह सात संचालकाच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा उपनिबंधक व्ही. व्ही. जाधवर यांनी काढले आहेत.
येथील बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने बाजार समितीवर प्रशासक म्हणून येथील सहाय्यक निबंधक अधिकारी कार्यरत होते. बाजार समिती निवडणूक विधानसभा निवडणुकीपुर्वी होणे कठीण असून त्या अनुषंगाने पणन मंत्रालयाने येथील बाजार समितीवर सात सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्याच्या सुचना जिल्हा उपनिबंधक हिंगोली यांना १ जुलै रोजी कक्ष अधिकारी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मुंबई यांनी दिल्या होत्या.
या आदेशान्वये जिल्हा उपनिबंधक व्ही. व्ही. जाधवर यांनी बुधवारी सहा महिने कालावधीसाठी प्रशासकीय संचालक मंडळाच्या नियुक्तीचे आदेश काढले. प्रशासकीय संचालक मंडळात मुख्य प्रशासकपदी नारायण सीताराम खेडेकर तर सदस्यपदी द्वारकादास चर्तुभूज सारडा, सविता चंद्रकांत हराळ, विठ्ठल महादजी झुंगरे, बद्री गणेश राठोड, दिलीप सीताराम इंगळे, सुनील साहेबराव अवचार यांचा समावेश आहे. नियुक्त प्रशासकीय संचालक मंडळाने बुधवारीच प्रशासक इंगळे यांच्याकडून पदभार स्विकारला. (वार्ताहर)
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना डावलले
नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय संचालक मंडळात विधानसभा निवडणुकीचे गणित लावत काँग्रेसच्या सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात आघाडीची सत्ता असूनही बाजार समिती प्रशासक मंडळात केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांचांच समावेश झाल्याने स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये डावलल्याची भूमिका निर्माण झाली आहे. इतर विविध शासकीय समित्या प्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रशासकीय संचालक मंडळात घेणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची होती.