शेकापूर पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता
By Admin | Updated: May 8, 2015 00:26 IST2015-05-08T00:21:38+5:302015-05-08T00:26:35+5:30
उस्मानाबाद : शहर पाणीटंचाई निवारणार्थ शेकापूर तलावापासून रूईभर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या ६१.१३ लाखांच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे.

शेकापूर पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता
उस्मानाबाद : शहर पाणीटंचाई निवारणार्थ शेकापूर तलावापासून रूईभर जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाणीपुरवठा करण्याच्या ६१.१३ लाखांच्या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे.
२०१४-१५ च्या टंचाई कालावधीसाठी उस्मानाबाद शहर तातडीची पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेकापूर पाणीपुरवठा योजनेचा ६५.८९ लक्ष रुपये किंमतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर २४ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या सचिवस्तरीय स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यात ६५.८९ लाखांऐवजी ६१.१३ लाख किंमतीच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. सदर योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर योजनेकरिता आवश्यक पाणी उपलब्ध आहे किंवा कसे, याची खात्री करणे व आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध असल्यास तेवढ्या पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. सदर योजनेची देखभाल दुरुस्ती व योजनेचे व्यवस्थापन उस्मानाबाद नगर परिषदेकडे राहणार असून, योजनेची अंमलबजावणीही पालिकाच करणार आहे. या योजनेचे काम १ महिन्यात पूर्ण करण्यास सांगण्यात आले असून, योजनेच्या प्रारंभी शासनाकडून पन्नास टक्के इतका निधी देण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के निधी योजना कार्यान्वित झाल्यानंतर दिला जाणार असल्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)