वाळू माफियांसमोर प्रशासन हतबल
By Admin | Updated: May 22, 2017 23:39 IST2017-05-22T23:38:55+5:302017-05-22T23:39:42+5:30
आवारपिंपरी :अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देत वाळूमाफीयांनी रात्रीतून या तीनपैकी दोन वाळूसाठे गायब केले. त्यामुळे या वाळूमाफियांसमोर आता प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे.

वाळू माफियांसमोर प्रशासन हतबल
दत्ता नरुटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आवारपिंपरी : ग्रामस्थाच्या तक्रारीनंतर प्रशासनाने शनिवारी तालुक्यातील आवारपिंपरीनजीक नदीपात्रालगतच्या अवैध वाळूसाठ्यांचे पंचनामे केले. परंतु, अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देत वाळूमाफीयांनी रात्रीतून या तीनपैकी दोन वाळूसाठे गायब केले. त्यामुळे या वाळूमाफियांसमोर आता प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसत आहे.
परंडा तालुक्यातील आवारपिंपरी, देवगाव, सोनगिरी या गावात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत होता. पण याकडे तहसीलदारांकडून सतत दुर्लक्ष केले जात होते. आवारपिंपरी येथील विकास दत्तात्रय नरुटे यांनी १२ मे रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अवैध वाळू उपशाबाबत तक्रार अर्ज करुन येथील अवैध उपसा होत असताना तहसील प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप केला होता. १२ मे रोजी अर्ज देवूनही अवैध वाळू उपसा थांबत नसल्याने नरुटे यांनी २० मे रोजी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत शनिवारी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना अवैध वाहतुकीस आळा घालण्याच्या सूचना केल्या. यानुसार २० मे रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्र्मचारी परंडा तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी तालुक्यातील सोनगिरी, देऊळगाव, देवगाव, आवारपिंपरी येथील अवैध वाळू उपशाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान आवारपिंपरी येथील नदीपात्रालगत असलेले अवैध वाळूचे साठे आढळून आल्यामुळे त्यांनी या साठ्यांचे पंचनामे केले.
ही कारवाई शनिवारी रात्री ११ वाजता करण्यात आली. परंतु, अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देत गावातील वाळूमाफियांनी रात्री तीनपैकी दोन वाळूसाठे गायब केले. रविवारी सकाळी याची खबर उपविभागीय अधिकारी यांना मिळताच त्यांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शनिवारी पंचनामा केलेले दोन वाळू साठे गायब झाल्याचे त्यांच्या निदर्र्शनास आले. यावरून तलाठी, पोलीस पाटलांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
दरम्यान, रविवारी नदीपात्रातून किती वाळू उपसा झाला आहे याचीही त्यांनी पाहणी केली. तसेच रात्रीतून गायब झालेली वाळू गावातील रस्त्यावर अनेकांच्या घरासमोर टाकली असल्याचे त्यांना समजले. यावरून स्वत: वाळूची पाहणी करुन तलाठ्यांना त्याचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले. यानुसार तलाठी भोसले व पोलीस पाटील यांनी गावातील वाळूचे पंचनामे केले. यामध्ये गावातील १५ लोकांकडे जवळपास १०० ब्रास वाळू असल्याचे समोर आले. यामध्ये रघुनाथ विठ्ठल डाकवाले २० ब्रास, बाबासाहेब नवनाथ गुडे १० ब्रास, सर्जेराव थोरात १० ब्रास, नागनाथ पोपट नरुटे २० ब्रास, सरपंच सुरेश महादेव डाकवाले १० ब्रास असे २१ मे रोजी १३ जणांचे व २२ रोजी ६ जणांचे अवैध वाळू साठे दिसून आले. आवारपिंपरी येथील उल्का नदीपात्रातून मागील सहा महिन्यापासून शेकडो ब्रास वाळू उपसा झाला असून, याकडे महसूल प्रशासन डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. स्वत: उपविभागीय अधिकाऱ्यांनी वाळू माफियांवर धडक कारवाईची मोहीम सुरु केल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील दोन दिवसात १०० ब्रासपेक्षाही अधिक अवैध वाळू पकडण्यात आल्याने वाळू माफियांवर तसेच पंचनामा केलेला वाळूसाठा गायब करणाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष आहे.
शेजारील राज्यातून वाहतूक
उमरगा : तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज तसेच वाळू वाहतूक फोफावल्याचे चित्र आहे. याप्रकरणी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने शासनाला लाखोंचा चुना लागत आहे. दरम्यान, मागील सहा महिन्यात महसूल विभागाकडून आतापर्यंत अवैध वाळू व अवैध गौणखनीज वाहतूक प्रकरणी ३७ जणांवर दंडात्मक कारवाई करीत साडेनऊ लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
उमरगा सिमावर्ती तालुका असून, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्याच्या सिमा या तालुक्याला लागून आहेत. उमरगा तालुका व शहरात या शेजारच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू आणली जाते. तसेच रॉयल्टी चुकवून सिमेलगत भागातील गावात साठवून मागणीनुसार शहर आणि तालुक्याच्या इतर भागात पाठविली जाते. याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील भिमा, लातूर जिल्ह्यातील तेरणा नद्यातील वाळूचीही अवैधरित्या वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू आहे. अशीच परिस्थिती गौण खनीज तस्करांचीही आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पाच मंडळ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पाच स्वतंत्र पथके नियुक्त केली. यामार्फत सहा महिन्यात अवैध गौण खनीज वाहतूक करणाऱ्या सतरा जणांवर कारवाई करून ४ लाख ५२ हजार ४८० रुपये दंड वसुल करण्यात आला. तर २० प्रकरणात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करुन ४ लाख ८५ हजार ८८० रुपयांचा दंड बसविण्यात आला. सहा महिन्यात ९ लाख ३८ हजार ३६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र अद्यापही या प्रकारांना आळा घालण्यात पुर्णत: यश आलेले नाही.
पाच महिन्यात १४ लाखांचा दंड
कळंब : परजिल्ह्यातून नियमबाह्य वाळू तस्करी करणाऱ्यांकडून कळंब उपविभागीय कार्यालयाने तब्बल १४ लाख रुपयांची दंडाची वसुली मागील पाच महिन्यात केली आहे. याउपरही वाळू तस्करीचा बाजार जोमात सुरू असल्याने यावर आणखी कडक कार्यवाहीची आवश्यकता आहे.
कळंब शहर तसेच तालुक्यात व उस्मानाबाद परिसरात सध्या बीड जिल्ह्यातून वाळू पुरवठा होत आहे. तेथील काही वाळूघाटांचे लिलाव झाल्याने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा व पुरवठा होत आहे. ही वाळू कळंब व उस्मानाबाद तालुक्यात कळंबमार्गे ट्रक, टिप्पर या वाहनांद्वारे येते. या वाहनांची कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत तपासणी करून नियमबाह्यपणे वाळू वाहतूक करणाऱ्यांवर दंडाची आकारणी केली जात असली तरी मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असल्याचे चित्र आहे. जानेवारी-२०१७ पासून कळंब उपविभागीय कार्यालयाने तब्बल १४ लाख रुपयांचा दंड या वाळू वाहतूकदारांकडून वसूल केला आहे. यामध्ये जानेवारीमध्ये ३८ हजार ५०० रुपये, फेब्रुवारी ५ लाख ९ हजार ६०० रुपये, मार्च १ लाख ९९ हजार ८०० रुपये, एप्रिल ५ लाख ४१ हजार ४०० रुपये, तर चालू मे महिन्यामध्ये १ लाख २ हजार रुपयांचा दंड वसूल करून तब्बल १३ लाख ९१ हजार ३०० रुपयांचा महसूल दंडाच्या माध्यमातून शासनास मिळवून दिला आहे.
एकीकडे प्रशासनाने दंडाचा फास आवळला असला तरी दुसरीकडे दंड भरूनही वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. दरम्यान, आम्ही नियमित अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कार्यवाही करीत आहोत. अशा प्रकरणात मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात आला आहे. ही कार्यवाही चालूच राहील, अशी माहिती उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी दिली.