कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:01+5:302021-05-07T04:04:01+5:30
औरंगाबाद: शहरात वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका करीत असलेल्या उपाययोजना आणि लसीकरणाची माहिती देण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी ...

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासन सज्ज
औरंगाबाद: शहरात वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महापालिका करीत असलेल्या उपाययोजना आणि लसीकरणाची माहिती देण्यासाठी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे पालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी प्रशासन तयार असल्याचा दावा प्रशासकांनी केला.
माजी महापौर नंदकुमार घोडले, राजेंद जंजाळ, विकास जैन, गजानन बारवाल, राजू शिंदे, प्रमोद राठोड, विजय औताडे, भाऊसाहेब जगताप, मनोज गांगवे, जयश्री कुलकर्णी, गंगाधर ढगे आदींनी यात सहभाग नोंदविला.
पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी या बैठकीत सूचना केल्या. वॉररूम रुग्णवाहिका व्यवस्थापन, बेड मॅनेजमेंट, हॉस्पिटल डिस्चार्ज मॅनेजमेंट आणि मनपा अॅपच्या माध्यमातून बेडची उपलब्धता करून देण्यात येत असल्याचे प्रशासकांनाी सांगितले. तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन आता तयार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये दोन ऑक्सिजन प्लांट उभारणीचा निर्णय घेतला आहे. उद्योजकांनी सहकार्य करण्यास सुरू केले आहे. लसीकरणाबाबत नागरिकांत असलेली भीती आता दूर होत असून लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. शहरात २ लाख ४४ हजार नागरिकांना लस दिली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असून कोरोनापासून मुक्त होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. सध्या लस कमी पडत असून लस लवकरच उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.
मनपा पदाधिकाऱ्यांनी केल्या सूचना
मनपाच्या माजी पदाधिकाऱ्यांनी सूचना करताना, खासगी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरसह सर्व प्रकारचे बेड्स व लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, रेमडेसिविर खरेदी करा, गॅस शवदाहिनी लवकर सुरू करा, शासकीय योजनांचे फलक प्रत्येक रुग्णालयाच्या दर्शनी भागावर लावावेत, अशा सूचना केल्या. तसेच मेल्ट्रॉनच्या महिला डॉक्टरांना रुग्णांशी नम्रतेने बोलण्यास सांगावे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची शक्यता असल्याने अधिक सजग राहण्याची सूचना माजी पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.