पीडित विद्यार्थिनीच्या मदतीला धावले प्रशासन
By Admin | Updated: December 29, 2016 22:52 IST2016-12-29T22:49:16+5:302016-12-29T22:52:57+5:30
माजलगांव : अत्याचार पीडितेला शाळेत बसू न देण्याचा प्रकार शिंपेटाकळीत समोर आला होता.

पीडित विद्यार्थिनीच्या मदतीला धावले प्रशासन
माजलगांव : अत्याचार पीडितेला शाळेत बसू न देण्याचा प्रकार शिंपेटाकळीत समोर आला होता. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच गुरूवारी प्रशासनाने गंभीर दखल घेतली. समाजकल्याणचे सहाययक आयुक्त रवींद्र शिंदे यांनी शिंपेटाकळीत धाव घेऊन तिला शाळेत प्रवेश देण्याबरोबरच दहावीची परीक्षा देण्यासाठी शाळेने विलंबासह परीक्षाशुल्क बोर्डाकडे भरण्याचे आदेश दिले.
गुरूवारी सदरील पीडित मुलीच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराची चौकशी झाली. सदरील मुलीचा टी.सी., तिची उपस्थिती व इतर बाबी तपासण्यात आल्या. त्यात मुलीचा टी.सी. तयार केल्याची बाब समोर आल्यामुळे येथील शिक्षक सी.व्ही.मठपती यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले.
आत्महत्येचे निवेदन तहसीलदारांना दिल्यामुळे महसूल विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने येथील उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांनी तात्काळ शाळेस भेट दिली.
पीडित मुलीची चौकशी करीत तिची शिकण्याची इच्छा पाहता इच्छेशिवाय टी.सी. देण्यात येवू नये, दहावी परीक्षेची फीस विलंबासह बोर्डाकडे भरावी तसेच संपूर्ण शैक्षणिक साहित्य शाळेकडून तिला पुरविण्यात यावे असे आदेश दिले.
पीडित मुलगी व तिच्या आईला संजय गांधी निराधार योजनेतून लाभ देण्यात येण्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश देखील तहसीलदारांनी दिले. (वार्ताहर)