गायरान जमीन हक्कासाठी प्रशासनाच्या हालचाली
By Admin | Updated: August 4, 2014 00:48 IST2014-08-04T00:13:15+5:302014-08-04T00:48:36+5:30
नितीन कांबळे, कडा आष्टी तालुक्यातील ४५ गावातील दलित, आदिवासी, भूमिहीन शेतकरी गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून गायरान जमीन कसत आहेत़ या जमिनीचा मालकी हक्क देण्याच्या प्रशासकीय कामाला आता वेग आला आहे़

गायरान जमीन हक्कासाठी प्रशासनाच्या हालचाली
नितीन कांबळे, कडा
आष्टी तालुक्यातील ४५ गावातील दलित, आदिवासी, भूमिहीन शेतकरी गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून गायरान जमीन कसत आहेत़ या जमिनीचा मालकी हक्क देण्याच्या प्रशासकीय कामाला आता वेग आला आहे़
आष्टी तालुक्यातील ४५ गावांमधील जवळपास ८०० शेतकरी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमीन कसत आहेत़ 'कसेल त्याची शेती' या घोषणेप्रमाणे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क द्यावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलनही केले आहे़ त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवर मालकी हक्क देण्यासंदर्भातच्या कामाला वेग आला असल्याचे दिसून येत आहे़
तालुक्यातील वाकी, पिंपरखेड, फातेवडगाव, कानडी, पाटसरा, बोरोडी, घोंगडेवाडी, धिर्डी, मांडवा, पारुडी, सराटे वडगाव, लोणी देवळाली, धामणगाव, दादेगाव, चोभा निमगाव, करेवाडी, सुर्डी, सांगवी आदी गावातील शेतकरी कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमीन कसत आहेत़ या जमिनी लाभार्थ्यांच्या नावाने कराव्यात यासाठी अनेक शेतकरी तहसील कार्यालयात खेटे घालीत आहेत़ या जमिनी लवकरच त्यांच्या नावे कराव्यात, अशी मागणी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी केली आहे़
तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी राजीव शिंदे म्हणाले की, ४५ गावांमधील अतिक्रमणे ही उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथील याचिका व २८ नोव्हेंबर १९९१ चा शासन निर्णयानुसार १९८८-८९ पूर्वीचे असल्याचे दिसून येते़ त्यामुळे सदरील शेतकऱ्यांना मालकी हक्क देण्यात यावा यासाठी शिफारस करण्यात आली आहे़