वाळूज महानगरात प्रशासनाला हॉकर्स झोनचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 23:17 IST2019-06-14T23:17:24+5:302019-06-14T23:17:34+5:30
वाळूज महानगर परिसरात एकही हॉकर्स झोन नसल्याने व्यवसायिकांनी फुटपाथ व मुख्य रस्त्यावरच ठाण मांडले आहे.

वाळूज महानगरात प्रशासनाला हॉकर्स झोनचा विसर
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात एकही हॉकर्स झोन नसल्याने व्यवसायिकांनी फुटपाथ व मुख्य रस्त्यावरच ठाण मांडले आहे. प्रशासनालाही हॉकर्स झोनचा विसर पडल्याने मोक्याच्या जागा व्यवसायिकांनी बळकावल्या आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
औद्योगिक क्षेत्र असल्याने वाळूज महानगरात नागरी वसाहतीचा विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे या भागातील बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव, वाळूज आदी ठिकाणी मुख्य चौक व रस्त्यावर मोक्याच्या जागांसह पदपथांवर विविध व्यवसायिकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले आहेत. शिवाय या भागात पार्किंगसाठी आरक्षित जागा काहींनी हडप केल्या आहेत.
पार्किंगला जागा नसल्याने बाजारपेठेत येणारी वाहने मुख्य रस्त्यावरच उभी केली जातात. बजाजनगरातील मोहटादेवी मंदिर चौक, लोकमान्य चौक, जयभवानी चौक, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, कोलगेट चौक, पंढरपूरातील तिरंगा चौक, पंढरपूर चौक, रांजणगाव मुख्य रस्ता. वाळूज चौक, वाळूज-कमळापूर रस्ता या ठिकाणी तर रस्त्यावरील वाहनांमुळे कायम वाहतुकीची कोंडी होते.
वाहतूक कोंडीमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याने वाहनधारकांना वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पादचाऱ्यांना तर जिव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाकडे हॉकर्स झोनच्या मुद्द्याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
या विषयी एममआयडीसीचे अभियंता बी.एस. दिपके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, तो होऊ शकला नाही.