३९ लाख रुपयांची ‘अॅडजस्टमेंट’
By Admin | Updated: May 8, 2017 23:34 IST2017-05-08T23:31:05+5:302017-05-08T23:34:02+5:30
उदगीर : एखाद्या सर्वसामान्य ग्राहकाचे बिल थकल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात तत्परता दाखविणाऱ्या महावितरणने धन‘कुबेरां’वर मात्र चांगलीच कृपादृष्टी ठेवली आहे़

३९ लाख रुपयांची ‘अॅडजस्टमेंट’
चेतन धनुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगीर : एखाद्या सर्वसामान्य ग्राहकाचे बिल थकल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात तत्परता दाखविणाऱ्या महावितरणने धन‘कुबेरां’वर मात्र चांगलीच कृपादृष्टी ठेवली आहे़ महावितरणच्या देवणी विभागात केवळ आठ दिवसांमध्ये तब्बल ५५७ ग्राहकांना ३९ लाख रुपयांची सूट ‘अॅडजस्टमेंट’च्या नावाखाली देण्यात आली आहे़ ही बाब लक्षात येताच वरिष्ठ स्तरावरुन आता त्यामागच्या ‘अर्थ’कारणाचा शोध घेतला जात आहे़
कोणत्या न् कोणत्या कारणातून चर्चेत राहणारा महावितरणचा देवणी विभाग यावेळी बिलातील गोलमालामुळे चर्चेत आला आहे़ मागील आर्थिक वर्षामध्ये वीजबील थकबाकीदारांवर देवणी विभागाने चांगलीच कृपादृष्टी राखली आहे़ वीज ग्राहकांना बंद मीटर, फॉल्टी मीटरमुळे किंवा काही तांत्रिक चुकांमुळे अवाजवी बिले पाठविली जातात़ याविषयी ग्राहकाने तक्रार केल्यास त्याची तपासणी करुन बिलातील रक्कम ‘अॅडजस्टमेंट’ म्हणून कमी करुन दिली जाते़
मात्र, याच अॅडजस्टमेंटच्या नावाखाली देवणी विभागातील तब्बल ५५७ ग्राहकांना लाभ दिला गेला आहे़ विशेष म्हणजे एकाच महिन्यातील केवळ आठ वेगवेगळ्या तारखांना ही अॅडजस्टमेंट केली गेली आहे़ अगदी दोन-तीनशे रुपयांपासून ते ९० हजार रुपयांपर्यंतची रक्कम अॅडजस्टमेंट म्हणून बिलावरुन कमी करण्यात आली़ त्याची एकूण रक्कम तब्बल ३८ लाख ९३ हजार ३०७ रुपये इतकी आहे़ एकाच महिन्यात इतकी मोठी अॅडजस्टमेंट अमाऊंट पाहून महावितरणचे वरिष्ठ अधिकारीही चक्रावून गेले आहेत़
२०१५-१६ या आर्थिक वर्षातील जानेवारी २०१६ मध्ये ही मेहेरबानी दाखविली गेली आहे़ १, २, ३, ८,९,१०, ११ व १२ जानेवारी या तारखांमध्ये ५५७ ग्राहकांची अॅडजस्टमेंट केली गेली़ इतक्या कमी कालावधीत इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या ग्राहकांना ही सवलत दिली गेली, यावर संशय व्यक्त केला जात आहे़