व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार - सुप्रिया सुळे
By Admin | Updated: January 13, 2015 00:11 IST2015-01-12T23:53:22+5:302015-01-13T00:11:12+5:30
जालना : युवा पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आगामी वर्षात राज्यातील विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून

व्यसनमुक्त महाराष्ट्र अभियान राबविणार - सुप्रिया सुळे
जालना : युवा पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहिजे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने आगामी वर्षात राज्यातील विविध महाविद्यालयांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी येथे सांगितले.
युवा दिनानिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने राज्यातील सहा युवक-युवतींना सोमवारी येथील मत्स्योदरी महाविद्यालयात सुळे यांच्या हस्ते युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आ. राजेश टोपे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, प्राचार्य आर.जे. गायकवाड, उत्तमराव पवार, अॅड. संजय काळबांडे, अॅड. पंकज बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुळे पुढे म्हणाल्या, मी आयुष्याकडे वेगळ्या पद्धतीने बघते. यश-अपयश या नेहमीच येणाऱ्या गोष्टी असतात. राजकारण आणि समाजकारणाचे तसेच आहे. सत्ता नसली की काम कमी झाले, असे होत नाही. याचा अनुभव सध्या मी घेत आहे. कारण मागील १५ वर्षांच्या काळात आपण उद्घाटन समारंभांना हजेरी लावली.
मागील सहा महिन्यांच्या काळात सरकार कुठे चूक करते, याकडे मी बारकाईने लक्ष देत आहे. सत्तेपेक्षा विरोधी पक्षात काम करताना कामे वाढतात. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान सुरू केले.
या उपक्रमाची आम्हीही प्रशंसा केली. परंतु कचरा गोळा करून पुढे करायचे काय? त्यावर काय प्रक्रिया करायची, हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे खा.
सुळे यांनी सांगितले. ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याच्या कामात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या शेवंता
बाजीराव राठोड या युवतीची प्रतिष्ठानने ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती
केली.
टोपे म्हणाले, स्वत: आत्मविश्वास निर्माण करून आपण यश संपादन करू शकतो, हे या पुरस्कारप्राप्त युवक-युवतींनी दाखवून दिले आहे. (प्रतिनिधी)
शेवंता बाजीराव राठोड - फरदापूर (ता. रेणापूर, जि. लातूर) या छोट्याशा गावात तांड्यावर जन्मलेल्या शेवंताने ठामपणे नकार देत स्वत:चा बालविवाह रोखला. ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्या आणि तांड्यावर जाऊन बालविवाहाच्या दुष्परिणामांबद्दल शेवंता जनजागृती करीत आहे.
४संदिप कारभारी गुंड - निघोज (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील संदिप याने विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे कार्य केले. ठाणे जिल्ह्यातील पष्टपोडा या अतिदुर्गम पाड्यातील जि.प. शाळेत शिक्षक म्हणून काम करताना संदिपने डिजीटल वर्ल्ड साकारले आहे.
४सुनंदा दत्तात्रय मांदळे - साविंदणे ( ता. शिरुर, जि.पुणे) येथील सुनंदाचा विवाह बालवयातच झाला. आर्थिक परिस्थितीशी मुकाबला करत सुनंदाने २००० सालापासून महिला बचत गटांच्या कामांना सुरूवात केली. एक गाव एक स्मशानभुमी ही संकल्पना गावात राबविली. विधवा मुलींच्या पुनर्विवाहाकरीता विशेष प्रयत्न केले.
४श्रद्धा भास्कर घुले - संगमनरे (जि. अहमदनगर) येथील श्रद्धाने इयत्ता सातवीपासूनच क्रीडा क्षेत्रात खेळातील लांब उडी आणि तिहेरी उडी या प्रकारात वाखाणण्याजोगे यश संपादन केले. २५ कास्य, २२ रौप्य, ६१ सुवर्णपदके अशा तब्बल १०८ पदकांची श्रद्धा मानकरी ठरली.
४विदित संतोष गुजराथी - नाशिक येथील विदितने बुद्धिबळ खेळात राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. एशियन स्पर्धेत संयुक्त विजेतेपद, कॉमनवेल्थ स्पर्धेत १ वेळा सुवर्णपदक, १४ वर्षाखालील जागतिक सुवर्णपदक पटकावणारा एकमेव खेळाडू.
४अमोल दत्तात्रय करचे - होळ (ता. बारामती, जि. पुणे) येथील अमोल हा दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. दुसरीपासून क्रिकेटची आवड असलेल्या अमोलने २०१३-१४ मध्ये बंगळूरु येथे आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात मालिकावीर पुरस्कार पटकावला.