शाळा गंडातराने वाढविला अतिरिक्त शिक्षकांचा पेच
By Admin | Updated: April 19, 2015 00:49 IST2015-04-19T00:25:36+5:302015-04-19T00:49:20+5:30
बीड : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांमुळे पेचात असताना त्यात शुक्रवारी भर पडली

शाळा गंडातराने वाढविला अतिरिक्त शिक्षकांचा पेच
बीड : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांमुळे पेचात असताना त्यात शुक्रवारी भर पडली. बृहत आराखड्यातील ६३ शाळांमध्ये आरटीई निकष डावलले गेल्याचा अहवाल सहायक शिक्षण संचालकांनी दिल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या हजाराकडे गेली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी ८ हजार ५६४ इतके शिक्षकांची पायाभूत पदे मंजूर आहेत. ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार चालू वर्षीची संचमान्यता मिळणे आवश्यक होते. मात्र, अद्यापपर्यंत संचमान्यतेवर मंजुरीची मोहोर उमटलेली नाही. बृहत आराखड्यामध्ये २२१ शाळा मंजूर झाल्या होत्या. या शाळा सुरू करताना आरटीई निकष डावलले जाणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र, काही शाळांनी नियमांना फाटा दिला. तीन महिन्यांपूर्वी सहायक संचालक दिनकर टेमकर यांनी ४० गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकांमार्फत बृहत आराखड्यातील सर्वच शाळांची तपासणी केली. यामध्ये ६३ शाळांमध्ये अनियमितता आढळली. याचा अहवाल बाहेर आल्यानंतर ६३ शाळांमध्ये प्रत्येकी दोन असे मिळून १२६ शिक्षक अतिरिक्त ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात ९२६ शिक्षक आले. त्यापैकी काही जणांना पदस्थापना मिळाल्या. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा आकडा ८४७ असा होता. या शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत काय करायचे ? हा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर होता. त्यातच बृहत आराखड्यातील ६३ शाळा गोत्यात आल्यामुळे १२६ शिक्षकांची भर पडली आहे. परिणामी अतिरिक्त शिक्षकांची संख्या ९७१ इतकी झाली आहे.
दरम्यान, अतिरिक्त ठरलेले शिक्षक मागील वर्षभरापासून विनावेतन आहेत. पदस्थापना, वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर कायम आहे. (प्रतिनिधी)