तपासासाठी द्यावे लागले अतिरिक्त पोलीस
By Admin | Updated: November 26, 2014 01:10 IST2014-11-26T00:56:47+5:302014-11-26T01:10:38+5:30
औरंगाबाद : मुकुंदवाडी ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निष्क्रियतेचा कळसच गाठलाय. शेकडो गुन्ह्यांचे तपास रखडलेत

तपासासाठी द्यावे लागले अतिरिक्त पोलीस
औरंगाबाद : मुकुंदवाडी ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निष्क्रियतेचा कळसच गाठलाय. शेकडो गुन्ह्यांचे तपास रखडलेत. अनेक गुन्ह्यांच्या तपासाची कागदपत्रे पूर्ण झालेली नाहीत. परिमाणी, या ठाण्याला न्यायालयीन कामकाजात अनंत अडचणी येत आहेत. अनेकदा तंबी देऊनही या पोलिसांना काहीच फरक पडला नाही. त्यामुळे मुकुंदवाडी पोलिसांचे हे खरकटे (गुन्ह्यांचे तपास, कागदपत्रे) काढण्यासाठी पोलीस मुख्यालयातून वीस जमादारांची मुकुंदवाडी ठाण्यात तात्पुरती नियुक्ती करण्याची नामुष्की पोलीस आयुक्तांवर आली आहे.
सुमारे सव्वाशे पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असलेल्या या ठाण्याची हद्द तशी पाहिली तर इतर पोलीस ठाण्यांच्या तुलनेत खूप मोठी आहे असे नाही. हद्दीच्या तुलनेत येथे नियुक्त पोलिसांची संख्या पुरेशी आहे; परंतु पूर्वीपासूनच येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारीवर वचक ठेवलाच नाही.
काही कर्मचाऱ्यांनी आपल्या ‘आर्थिक’ हितसंबंधामुळे ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांना खतपाणीच घातले. त्यामुळेच आज आयुक्तालयातील एक त्रासदायक पोलीस ठाणे, अशी मुकुंदवाडीची ओळख निर्माण झालेली आहे. येथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख प्रचंड वाढलेला आहे.
पहिल्यांदाच आली अशी नामुष्की!
मुकुंदवाडी ठाण्यातील गुन्ह्यांच्या वाढलेल्या ‘पेंडन्सी’बाबत पोलीस आयुक्त, उपायुक्तांनी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेकदा तंबी दिली. मात्र, त्यांच्यात काहीच फरक पडलेला नाही.
शेवटी रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला मदत करण्यासाठी आणि गुन्ह्यांची अपूर्ण कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी पोलीस मुख्यालयातील २० अनुभवी तपासिक अंमलदार देण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला. मुकुंदवाडी पोलिसांचे हे ‘खरकटे’ काढण्यासाठी शनिवारपासून हा अतिरिक्त फौजफाटा ठाण्यात पाठविण्यात आला आहे. आयुक्तालयाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडल्याचे सूत्रांनी सांगितले. ही बाब मुकुंदवाडी ठाण्यासाठी लज्जास्पदच मानली जात आहे.1
मुकुंदवाडी ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेने इतका कळस गाठला आहे की, घडलेल्या गुन्ह्याचा दोन- दोन दिवस एफआयआरही लिहिला जात नाही. फिर्यादीची संगणकावर तक्रार बनविल्यानंतर त्याच्याकडून कोऱ्या एफआयआरवर स्वाक्षरी घेतली जाते आणि दोन, तीन दिवसांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रजिस्टरवर हस्तलिखित एफआयआर लिहिला जात आहे. 2
या ठाण्यात आजघडीला कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी निम्मे कर्मचारी हे गेल्या आठ-दहा वर्षांपासून याच ठाण्यात तळ ठोकून बसलेले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे हद्दीतील गुन्हेगार, अवैध धंदेवाल्यांशी हितसंबंध वाढलेले आहेत. या हितसंबंधांमुळेच गुन्हेगारांना अभय मिळत असून, गुन्हेगारी वाढत आहे. शिवाय हितसंबंधांमुळेच अनेक तपास प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आजघडीला मुकुंदवाडी ठाण्याच्या एका एका तपासिक अंमलदाराकडे किमान ५० गुन्ह्यांचे तपास प्रलंबित आहेत. त्यातच या ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे एका गुन्ह्याचा तपास लागतो ना लागतो तोच दुसऱ्या आखणी दोन, तीन गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी या अंमलदाराच्या अंगावर येऊन पडते. त्यामुळे गुन्ह्यांची ‘पेंडन्सी’ प्रचंड वाढलेली आहे. शेकडो गुन्ह्यांचा तपास तर रखडलेला आहेच. त्याचबरोबर घडलेल्या गुन्ह्यांची येथील पोलिसांनी कागदोपत्री कारवाईही पूर्ण केलेली नाही. कागदपत्रे अपूर्ण असलेल्या गुन्ह्यांची संख्याही शेकडोच्या घरात आहे. अपूर्ण कागदपत्रांमुळे न्यायालयीन कामालाही अडचणी येत आहेत.