धनगर समाजाचा एसटीत समावेश करा
By Admin | Updated: August 15, 2014 01:35 IST2014-08-15T01:16:59+5:302014-08-15T01:35:28+5:30
बीड: धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी जोर धरीत असून, गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, अंबाजोगाई, केज, धारुर, शिरुर कासार,

धनगर समाजाचा एसटीत समावेश करा
बीड: धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी जोर धरीत असून, गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, अंबाजोगाई, केज, धारुर, शिरुर कासार, घाटनांदूर याठिकाणी धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको केला. यामुळे जवळपास दीड ते दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
अंबाजोगाईत वाहतूक ठप्प
महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाचा समावेश एस. टी प्रवर्गात करावा, आरक्षणाचा निर्णय तात्काळ घ्यावा या मागणीसाठी येथील धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी यशवंतराव चव्हाण चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहरात पुकारलेल्या बंदला शहरवासियांनी संमिश्र प्रतिसाद दिला. या आंदोलनाचे नेतृत्व धनगर आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांनी केले. या आंदोलनात धनगर समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिरुरमध्ये आंदोलन
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, शिवसंग्राम आदी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनात डॉ.मधुसूदन खेडकर, शेख फय्याज, वसंत साबळे, सागर केदार, संदीप गाडेकर, रवि आघाव, सागर पाटील, प्रल्हाद धनगुडे, संदीप गाडेकर, रामदास बडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
धारुर शहरात झालेल्या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. घोषणाबाजीने शहर दणाणून गेले होते. यावेळी आ. प्रकाश सोळंके, रमेश आडसकर, भाजपा प्रदेश चिटणीस आर.टी. देशमुख यांनी, डॉ. भागवत सरवदे, तुकाराम येवले, अशोक करे सहभागी झाले होते.
घाटनांदूरमध्ये मेंढ्या घेऊन आंदोलन
घाटनांदूर येथे आंदोलक मेंढ्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. केज येथेही आंदोलन करण्यात आले. तसेच शहर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)