प्रवेशासाठी पालकांना भेटल्यास कारवाई
By Admin | Updated: June 11, 2017 00:41 IST2017-06-11T00:40:46+5:302017-06-11T00:41:20+5:30
बीड : १५ जून रोजी शाळा-महाविद्यालयांना सुरुवात होत आहे.

प्रवेशासाठी पालकांना भेटल्यास कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : १५ जून रोजी शाळा-महाविद्यालयांना सुरुवात होत आहे. तत्पूर्वी, मुलांच्या प्रवेशासाठी पालकांना भेटल्यास शाळा-महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार आहे. तसे आदेश शिक्षण विभागाने काढले आहेत. यामुळे दुकानदारीला चाप बसणार आहे.
जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा-महाविद्यालयांची संख्या ६४० एवढी आहे. १५ जून रोजी शाळा भरणार असल्याने शाळा-महाविद्यालय प्रशासनाकडून आपला कोटा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना भेटण्याची घाई केली जात आहे. तसेच मनमानीपणे डोनेशन आकारून पालकांची आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे वाढल्या आहेत. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने प्रवेशापूर्वी विद्यार्थी व पालकांना भेटणे गैर ठरविले आहे.
या कारवाईच्या आदेशामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर मनमानी डोनेशन आकारून दुकानदारी चालविणाऱ्या शाळा महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहेत.
दुकानदारीला चाप : काय आहेत आदेश ?
कायम विनाअनुदानित/स्वयंअर्थसाहाय्य व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त शाळांनी फीस निश्चिती करून त्यास पालक शिक्षक संघाची मान्यता घ्यावी, निश्चित केलेली फीस/शैक्षणिक शुल्क शाळेच्या दर्शनी भागावर प्रदर्शित करावे, प्रवेशासाठी डोनेशन, मुलाखती घेणे हे नियमबाह्य आहे, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके खरेदी करण्याबाबत पालकांना सक्ती करू नये, अनेक शाळा शैक्षणिक साहित्य शाळेकडूनच किंवा शाळेने निश्चित केलेल्या दुकानदारांकडूनच खरेदी करण्याबाबत आग्रह धरू नये, ज्या शाळा शासनाच्या परवानगीशिवाय सुरू आहेत, तसेच शासनाने परवानगी दिलेल्या ठिकाणी सुरू न करता विनापरवानगी स्थलांतरित केलेल्या आहेत, अशा शाळांची माहिती गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संकलित करून अशा अनधिकृत शाळांविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करावी, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांना दिले आहेत.