पोलिसांच्या वाहनांवर आता वायुवेग पथकांमार्फत कारवाई
By Admin | Updated: September 17, 2014 01:12 IST2014-09-17T00:42:18+5:302014-09-17T01:12:33+5:30
उस्मानाबाद : सर्वोच्च न्यायालयाने वाहनावरील दिव्याच्या वापरासंबधी काठोर निर्देश दिलेले असतानाही पोलिस प्रशासनाकडून त्यांच्या वाहनांवरील अंबर दिवे काढले जात नसल्याबाबत

पोलिसांच्या वाहनांवर आता वायुवेग पथकांमार्फत कारवाई
उस्मानाबाद : सर्वोच्च न्यायालयाने वाहनावरील दिव्याच्या वापरासंबधी काठोर निर्देश दिलेले असतानाही पोलिस प्रशासनाकडून त्यांच्या वाहनांवरील अंबर दिवे काढले जात नसल्याबाबत ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशन करून उघडकीस आणले होते. याची गंभीर दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षकांना आता पोलिसांच्या अशा वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील महसूल विभाग व परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वाहनावरील दिवे बदलून नियमाची अमलबजावणी केली. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस विभागाने हे नियम धाब्यावर बसवित गाडीवरील अंबर दिवे कायम ठेवल्याचे या स्टींग आॅपरेशनदरम्यान दिसून आले होते. याबाबत छायाचित्रासह वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर परिवहन कार्यालयाने पोलिस अधिक्षकांना पत्र पाठवून पोलिस प्रशासनातील वाहनांवरील दिवे बदलण्याबाबत कळविले होते. मात्र, पोलिस अधीक्षकांसह अन्य अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून, हे दिवे अद्यापही कायमच आहेत.
दरम्यान, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रैवार यांनी याबाबत वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षकांना पत्र पाठवून ज्या वाहनांवर अंबर दिवा अनुज्ञेय नसूनही तो बसविण्यात आला आहे अशा वाहनांवर शासकीय नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश सोमवारी दिले आहेत. दरम्यान, याबाबतचा अहवालही वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)