शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात हाणामारी
By Admin | Updated: March 23, 2016 01:06 IST2016-03-23T00:50:45+5:302016-03-23T01:06:12+5:30
नळदुर्ग : जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास बाभळगाव (ता़तुळजापूर) येथे घडली़

शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात हाणामारी
नळदुर्ग : जिल्हा परिषद शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमातच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास बाभळगाव (ता़तुळजापूर) येथे घडली़ दरम्यान, सुरू असलेले भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ६५ वर्षीय इसमाला अचानक ह्दयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़
बाभळगाव येथे पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे़ या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवारी सायंकाळी बाभळगाव येथील चौकात सुरु होते. यावेळी सत्कार व लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना झालेल्या आरडाओरडीचे पर्यावसन दोन गटात हाणामारीत झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेले मयत सुधाकर माणिक बागडे ( वय ५५, रा. बाभळगाव) हे भांडण सोडविण्यासाठी गेले होते़ त्यावेळी त्यांना ऱ्हदयविकाराचा झटका आल्याने ते तेथेच कोसळले. त्यांना उपचारासाठी घेवून जात असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देविदास सुधाकर बागडे यांनी दिलेल्या माहितीवरुन नळदुर्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, भांडण तक्रारी सोडविताना छातीत दुखू लागल्याने सुधाकर बागडे हे खाली पडले़ त्यांना दवाखान्यात घेवून जाताना त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)