तक्रार आली तरच रिक्षाचालकांवर कारवाई

By Admin | Updated: November 7, 2014 00:53 IST2014-11-07T00:39:03+5:302014-11-07T00:53:01+5:30

औरंगाबाद :तक्रार आली तरच रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची भूमिका प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतली आहे.

Action on rickshaw drivers only after complaint | तक्रार आली तरच रिक्षाचालकांवर कारवाई

तक्रार आली तरच रिक्षाचालकांवर कारवाई

औरंगाबाद : शहरात मध्यरात्रीनंतर मीटरने जाण्यास नकार देऊन प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारणे, विविध मार्गांवरील भाडे नाकारणे याबाबत तक्रार आली तरच रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची भूमिका प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) घेतली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी चालणाऱ्या रिक्षाचालकांच्या दादागिरीला आरटीओ प्रशासनाकडूनच अभय मिळत आहे.
शहरातील रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्थानकात रात्रीच्या वेळी विविध ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांकडून रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारणी केली जात आहे. मीटरने येण्याची मागणी केल्यानंतर रिक्षाचालक प्रवाशांना नकार देऊन दुसरी रिक्षा बघण्याचा सल्ला देतात. रात्री १२ वाजेनंतर रिक्षांचे भाडे दीडपट घेण्याचा नियम आहे; परंतु त्याकडे अनेक रिक्षाचालक साफ कानाडोळा करीत आहेत. दिवसा ज्या मार्गासाठी ४० ते ५० रुपये घेतले जातात, त्याच मार्गावर रात्री १२ वाजेनंतर दुप्पट, तिप्पट भाडे आकारतात. अनेक ठिकाणी ते यायला तयार होत नाहीत. ज्या ठिकाणी जायला तयार असतात त्यासाठी १०० ते ३०० रुपयांपर्यंत भाडे मागतात. अवाच्या सव्वा भाडे आकारून रिक्षाचालक प्रवाशांची लूट करीत आहेत; परंतु त्याक डे कोणाचे लक्ष जात नसल्याचे दिसून येत आहे.
कारवाईची प्रतीक्षा
रात्रीच्या वेळी प्रवाशांकडून अवाच्या सव्वा भाडे आकारणाऱ्या, मीटरने जाण्यास नकार देणाऱ्या, तसेच थेट भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे, तसेच असा प्रकार सातत्याने करणाऱ्या रिक्षाचालकांचा वाहन चालविण्याचा परवानाच रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविला पाहिजे, असे मत काही प्रवाशांनी व्यक्त केले.
एकही तक्रार नाही
मीटरने येण्यास नकार देणाऱ्या रिक्षाचालकांबाबत वर्षभरात एकही तक्रार आलेली नाही. रिक्षाचा क्रमांक, मोबाईल नंबर लिहून पोस्ट कार्डद्वारेही तक्रार करता येईल. तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल. परंतु तक्रार केली जात नाही. प्रवाशांनी याबाबत तक्रार केली पाहिजे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी गोविंद सैंदाणे म्हणाले.
तक्रार देण्याची गरज कशाला?
सर्वसामान्य प्रवासी अशा प्रकाराबाबत तक्रार देत नसल्याचे दिसून येते. परंतु त्यामुळे रिक्षाचालकांकडून होणाऱ्या गैरसुविधेबाबत तक्रार येण्याची वाट पाहण्यापेक्षा संबंधित प्रशासनाने स्वत:हून कारवाई केली पाहिजे, असेही काही प्रवाशांनी म्हटले.

Web Title: Action on rickshaw drivers only after complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.