बालमृत्यू रोखण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’!
By Admin | Updated: September 19, 2014 01:01 IST2014-09-19T00:33:36+5:302014-09-19T01:01:41+5:30
बीड : जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण राज्याच्या तुलनेत पुढे असून ते कमी करण्यासाठी युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संघटनेने ‘फोकस’ केला आहे़ बालमृत्यूची कारणमिंमासा

बालमृत्यू रोखण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’!
बीड : जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण राज्याच्या तुलनेत पुढे असून ते कमी करण्यासाठी युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संघटनेने ‘फोकस’ केला आहे़ बालमृत्यूची कारणमिंमासा शोधण्यासाठी युनिसेफचे आरोग्यतज्ज्ञ डॉ़ खनिंद्र भियान हे बुधवारी बीडला आले़ गुरुवारी त्यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेतली़ जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक आरोग्य प्रशासनाला कालबद्ध ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना दिल्या़
माता व बालकांच्या आरोग्य सुविधांची पाहणी करण्यासाठी २२ ते २८ जून २०१४ यादरम्यान केंद्र शासनाच्या युनिसेफमधील डॉ़ अजय पटले बीडमध्ये आले होते़ त्यांनी येथील आरोग्यसुविधांची पाहणी करुन अहवाल राज्याच्या प्रधानसचिवांसह संचालकांकडे दिला़ राज्यात एक हजार मुलांमागे २५ मुलांचा मृत्यू होतो़ हे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे़ मात्र, बीड जिल्ह्यात एक हजार मुलांमागे तब्बल ३४ मुलांचा मृत्यू होतो़ त्यामुळे बीडमध्ये अधिक प्रभावी उपायांची गरज आहे़ बालमृत्यू कमी करण्यासाठी डॉ़ खनिंद्र जिल्ह्यात दाखल झाले़ त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांच्याशी चर्चा केली़
जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
गुरुवारी सकाळी अकरा ते दीड वाजेपर्यंत युनिसेफचे आरोग्यतज्ज्ञ डॉ़ खनिंद्र भियान यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक झाली़ यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले की, आरोग्य सुविधांत सुधारणांचे प्रयत्न सुरु आहेत़ मात्र, बालविवाह, स्थलांतर, गरिबी, अज्ञान हे इथले बेसिक प्रश्न आहेत़ त्यामुळे एकीकडे सामाजिक सुधारणांबरोबरच आरोग्य सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आहेत़ बालमृत्यू रोखण्यासाठी ‘कॉल टू अॅक्शन’ हा कार्यक्रम सुरु करण्याची सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिली़ (प्रतिनिधी)