लातूर-उदगीरात अवैध वाहनांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:56 IST2016-07-23T00:37:49+5:302016-07-23T00:56:59+5:30
लातूर / उदगीर : अवैध वाहतुकीवर ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर उदगीर आणि लातूर शहरात पोलीस प्रशासनाकडून एकूण २९ अवैध

लातूर-उदगीरात अवैध वाहनांवर कारवाईचा बडगा
लातूर / उदगीर : अवैध वाहतुकीवर ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशननंतर उदगीर आणि लातूर शहरात पोलीस प्रशासनाकडून एकूण २९ अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. उदगीर येथे उपविभागीय अधिकारी व शहर पोलिसांनी रस्त्यावर उतरत १४ अवैध वाहनांवर कारवाई केली़ काळी-पिवळी जीप व मिनी बस अशा एकूण १४ गाड्या शहर पोलीस ठाण्यात उभ्या करण्यात आल्या़ लातुरातही वाहतूक शाखा व पोलिस प्रशासनाकडून शुक्रवारी दिवसभर अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कल्लूरजवळ झालेल्या भीषण अपघातानंतरही अवैध वाहतूक जैसे थे असल्याचे ‘लोकमत’ चमूने स्टिंग आॅपरेशन करुन मांडल्यानंतर पोलिसांना कारवाईची जाग आली़ शुक्रवारी सकाळपासूनच पोलिसांनी रस्त्यावर उतरुन अवैध वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली़ पोलीस रस्त्यावर उतरत असल्याचे लक्षात येताच काही वाहनांनी पळ काढला़
या कारवाईदरम्यान १४ गाड्या ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आल्या़ पहिल्यांदाच कारवाई झालेल्या गाड्यांना आर्थिक दंड (एक हजार रुपये) तर पहिला दंड होऊनही रस्त्यावर उतरलेल्या गाड्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई होत असल्याने प्रशासनाला उशिरा का होईना, पण जाग येत असल्याचे चित्र आहे़ घटना घडण्याच्या एक दिवसापूर्वीच पोलीस उपविभागीय अधिकारी अनिकेत भारती यांनी नव्याने रुजू झालेले सपोनि वाहतूक शाखा सुधीर सूर्यवंशी यांच्यासमवेत अवैध वाहतूक व रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई केली होती़
शहरात झालेल्या कारवाईनंतर बसस्थानक परिसरास अवैध वाहनांचा विळखा सैल झाला़ अशाच कारवाया सातत्याने झाल्या तरच अवैध वाहतुकीवर वचक बसेल, अशी कुजबूज कारवाईदरम्यान उपस्थितांमध्ये होती़ शहरातील कारवाईसोबतच ग्रामीण पोलीस ठाण्यांनीही आपआपल्या हद्दीत अशा प्रकारच्या कारवायात सातत्य ठेवल्यास नुकत्याच झालेल्या अपघातासारख्या घातक घटना घडणार नाहीत़