लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिनी रिमोटद्वारे आणि वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्या २२ ग्राहकांना पकडल्यानंतर शहरातील आणखी काही वीजचोरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेचे ४ अधिकारी आणि २० कर्मचाऱ्यांची चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन थेट वीजचोरीचा संशय असलेल्या ४० ग्राहकांच्या घरी ही पथके शुक्रवारी धडकली.चायना रिमोट, मीटरचे चक्र थांबविणारी इलेक्ट्रो मॅग्नेटिक बॅट आणि मीटरमध्ये फेरफार करून देत वीजचोरीसाठी ग्राहकांना मदत करणाऱ्या इलेक्ट्रेशियनसह २२ जणांविरुद्ध महावितरणने वेगवेगळे सहा गुन्हे नोंदविले. सिडको, सिटीचौक, जिन्सी आणि हर्सूल पोलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांचा एकत्रित तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी वीजचोरीचे तंत्रज्ञान अवगत असलेला मास्टरमाइंड किशोर रमेश राईकवार (रा. हर्सूल, मूळ रा. अमरावती) याच्यासह सात ग्राहकांना अटक केली होती. त्याने शेकडो ग्राहकांना वीजचोरी करण्यासाठी रिमोट विक्री करून अथवा मीटरमध्ये फेरफार करून मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. असे असले तरी त्याच्यासह शेकडो ग्राहकांचा वीज वापर दरमहा शून्य ते ३० युनिट आणि ३० ते १०० युनिटपर्यंतच असल्याचे समोर आले. अशा ग्राहकांवर वीजचोरीचा संशय आहे. संशयित ग्राहकांचे पंचनामे महावितरणने केले असून, त्या ग्राहकांवर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेची चार पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुन्हे शाखेच्या चार पथकांमार्फत वीजचोरांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:58 IST