छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांच्या अंतराने पुन्हा एकदा शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गुरुवारी एकाच दिवसात वाहतूक पोलिसांनी ४६७ चालकांची तपासणी करत ४ लाख ६१ हजारांचा दंड ठोठावून दीड लाखांचा दंड जागीच वसूल केला. शिवाय, अत्यंत बेजबाबदार व नियमबाह्य २२ चालकांच्या रिक्षा जप्त केल्याचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी सांगितले.
गेल्या सहा महिन्यांत रिक्षा व्यवसायात गुन्हेगारी वृत्तीच्या चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पैशांवरून प्रवाशांसोबत वाद, मारहाण करण्यासोबत लूटमार करण्यापर्यंत चालकांनी मजल मारली आहे. यात अनेक घटनांमध्ये महिला प्रवाशांनादेखील या मुजोर रिक्षा चालकांनी सोडले नाही. एका शासकीय महिला अधिकाऱ्यासोबत रेल्वेस्थानकावर रिक्षा चालकाकडून गैरप्रकार घडल्याची घटना ताजी असताना मोंढा नाका परिसरात चालत्या रिक्षातून महिला प्रवाशाला ढकलून देत पायावरून रिक्षा घालण्यात आली. यामुळे रिक्षा व्यवसायात गुन्हेगारांचे वाढत्या प्रमाणासोबत पुन्हा एकदा नागरिक, प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा उपस्थित झाला.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर कारवाईस प्रारंभयापूर्वी ‘लोकमत’ने प्रवासी सुरक्षेसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी ७०० पेक्षा रिक्षा चालकांवर कारवाई करून ७० पेक्षा अधिक रिक्षा जप्त करण्यात आल्या होत्या. गुरुवारीदेखील काही रिक्षा चालकांच्या गैरवर्तनाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर विनागणवेश, विनाकागदपत्र, विनालायसन्स, तसेच मद्य सेवन केलेल्या रिक्षा चालकांवर पोलिस निरीक्षक अमोल देवकर, सचिन इंगोले, हरेश्वर घुगे, सचिन मिरधे, उत्रेश्वर मुंडे, शंकर शिरसाठ यांनी कारवाई केली.
गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासणार कोण ?रिक्षा व्यवसायात गंभीर गुन्हे दाखल असलेले, जामिनावर सुटलेले चालक उतरले आहेत. याच्या तपासणीसाठी कुठलीच यंत्रणा ठरवण्यात आलेली नाही. एखादा गंभीर गुन्हा घडल्यानंतरच ही बाब उघडकीस येते. त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. मात्र, यात आरटीओकडून परिणामकारक कारवाई केली जात नसल्याने अशा चालकांचे फावत असल्याचे सांगितले जात आहे.