१६ स्त्रोतांचे अधिग्रहण

By Admin | Updated: June 29, 2014 00:38 IST2014-06-28T23:52:56+5:302014-06-29T00:38:21+5:30

बालाजी बिराजदार , लोहारा लोहारा : जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच अनेक गावांत पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर बनत आहे.

Acquisition of 16 sources | १६ स्त्रोतांचे अधिग्रहण

१६ स्त्रोतांचे अधिग्रहण

बालाजी बिराजदार , लोहारा
लोहारा : जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच अनेक गावांत पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर बनत आहे. सध्या तालुक्यातील ४७ पैकी ९ गावात १६ विद्युतपंपांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर संपूर्ण तालुक्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या पावसाची आकडेवारी पाहता केवळ गेल्यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात तालुकावासीयांना फारसा पाणीटंचाईचा सामना करावा लागलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून लोहारा शहरासह नऊ गावात पाणीटंचाई जाणवत असल्याने लोहाऱ्यात १, अचलेर ४, भोसगा, मार्डी, कमालपूर, करवंजी येथे प्रत्येकी २, कास्ती बु. नागूर, वडगाव येथे प्रत्येकी १ असे १६ विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी साठवण तलाव, पाझर तलावावरील विद्युत मोटारींचे कनेक्शन कापण्याचे काम तहसील कार्यालयाच्या पथकाकडून सुरू आहे. सध्या माकणी निम्न तेरणा प्रकल्प व धानुरी साठवण तलावावर असलेल्या विद्युत मोटारीचे कनेक्शन कापण्यात आले आहे. असे असले तरी या कारवाईसाठी तहसील प्रशासनाकडून ग्रामपंचायतीचे निवेदन किंवा एखाद्या तक्रारीची वाट पाहिली जात आहे.
प्रस्तावांना त्वरित मंजुरी
पावसाने दडी दिल्याने अनेक गावांत टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या टंचाईच्या काळात ग्रामपंचायतीकडून अधिग्रहणाचे प्रस्ताव आल्यास त्याला तात्काळ मान्यता देऊन तेथील पाणीटंचाई कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाईल, असे गटविकास अधिकारी ए. बी. शिंदे यांनी सांगितले.
पातळी खालावली
लोहारा शहरासह तालुक्यातील अनेक गावांना विद्युत पंपांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नसल्याने या स्त्रोतांची पाणीपातळी चांगलीच खालावत चालली आहे. हे स्त्रोत बंद पडल्यास गावाला पाणीपुरवठा कुठून करायचा, असा प्रश्न त्या-त्या गावच्या ग्रामपंचायतींसमोर आहे.

Web Title: Acquisition of 16 sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.