धान्य घोटाळ्यातील आरोपी मोकाटच
By Admin | Updated: July 4, 2017 23:49 IST2017-07-04T23:43:20+5:302017-07-04T23:49:35+5:30
परभणी : येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्यातील ३८ पैकी १७ आरोपींना पोलिसांनी ११ महिन्यांपासून अटक केलेली नाही.

धान्य घोटाळ्यातील आरोपी मोकाटच
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळ्यातील ३८ पैकी १७ आरोपींना पोलिसांनी ११ महिन्यांपासून अटक केलेली नाही. त्यामुळे हे आरोपी बिनधास्तपणे फिरत आहेत. शिवाय या घोटाळ्याचा तपासही पोलिसांनी अडगळीत टाकून दिला आहे.
परभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामात ४ कोटी ९७ लाख रुपयांचा धान्य घोटाळा झाल्या प्रकरणी १३ आॅगस्ट २०१६ रोजी परभणीतील कोतवाली पोलीस ठाण्यात तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे यांच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासात ४ कोटी ९७ लाख रुपयांचा हा धान्य घोटाळा २८ कोटींवर गेला व आरोपींची संख्या ३८ झाली. कोतवाली पोलिसांनी प्रारंभी अत्यंत गतीने तपास करुन ११ आरोपींना तातडीने अटक केली. त्यानंतर पुन्हा सहा आरोपी अटक झाले. हा तपास कोतवाली पोलिसांकडून काढला गेला. त्यानंतर या तपासाची गती मंदावली. या संदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा वाढल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने पुन्हा तीन आरोपींना अटक केली.
या प्रकरणातील एक आरोपी मयत आहे. उर्वरित १७ आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. यामध्ये ९ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय काही प्रतिष्ठित व्यक्तीही आरोपींमध्ये आहेत. त्यामुळे तब्बल ११ महिन्यांपासून या प्रकरणात पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली नाही. एरव्ही छोट्याशा गुन्ह्यामध्ये आरोपीच्या तातडीने मुसक्या आवळणारे पोलीस या गुन्ह्यामध्ये मात्र आरोपींना का अभय देत आहेत, असा सवाल सातत्याने उपस्थित झाला आहे. परंतु, पोलिसांनी यासंदर्भात त्यांची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर न मांडता चुप्पी साधणे पसंद केले आहे. त्यामुळे हे आरोपी आता उजळमाथ्याने सार्वजनिक कार्यक्रमात वावरताना दिसून येऊ लागले आहेत. शिवाय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही हे आरोपी हजेरी लावत आहेत. काही प्रतिष्ठित अधिकारी तर पोलीस अधीक्षक कार्यालयापासून दररोज ये-जा करतात. परंतु, पोलीस मात्र त्यांना अटक करण्याची तसदी घेत नसल्याची बाब नित्याचीच झाली आहे.