आरोपीस शिक्षा; साधा कारावास
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:18:30+5:302014-06-14T01:20:47+5:30
औंढा नागनाथ : माहेरीआलेल्या महिलेस अश्लील शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवून एका आरोपीस १ महिना साधा कारावास
आरोपीस शिक्षा; साधा कारावास
औंढा नागनाथ : माहेरीआलेल्या महिलेस अश्लील शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दोषी ठरवून एका आरोपीस १ महिना साधा कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. औंढा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेंडगे यांनी १२ जून रोजी हा निकाल दिला.
औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे ३० मे २००८ रोजी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली होती. मुंबईमधील चेंबूर भागात राहणारी ४० वर्षीय महिला आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी माहेरी आली होती.
सदरील महिला वडील व भावाशी बोलत असताना वामन रमेश चव्हाण (वय ५०), कांता वामन चव्हाण (२३), रोहिदास वामन चव्हाण (१८, तिघे रा. सिद्धेश्वर) हे त्याठिकाणी आले. ‘तू इथे आम्हाला शिकवायला आली आहेस का?’ असे म्हणून त्या तिघांनी तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, या आशयाची फिर्याद सदर महिलेने औंढा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी वामन रमेश चव्हाण, कांता वामन चव्हाण, रोहिदास वामन चव्हाण यांच्याविरूद्ध कलम ५०९, ३२३, ३४ भादंविनुसार औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करून तत्कालीन तपासिक अंमलदार सहायक पोलिस उपनिरीक्षक ए. सी. पठाण यांनी आरोपींना अटक केली आणि त्यांच्याविरूद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले.
हा खटला औंढा येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सादर साक्ष-पुराव्यांआधारे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेंडगे यांनी गुरूवारी या खटल्याचा निकाल दिला.
यातील आरोपी वामन रमेश चव्हाण यास कलम ५०९ भादंविनुसार दोषी ग्राह्य धरून एक महिना साधा कारावास व ५०० रूपये दंड, दंड न भरल्यास ८ दिवस साधा कारावास अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
तसेच न्यायालयाने कांता वामन चव्हाण व रोहिदास वामन चव्हाण या दोघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अॅड.महेश आहेर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)