बोल्डा टेकडीवर पकडले आरोपी

By Admin | Updated: August 18, 2014 00:32 IST2014-08-18T00:13:42+5:302014-08-18T00:32:14+5:30

हिंगोली/कळमनुरी : आदिलाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या रेल्वेवर पडलेल्या दरोड्यातील चार आरोपींना काही तासांतच बोल्डा टेकडीवर पकडण्यात कळमनुरी पोलिसांना यश आले.

Accused arrested on Bollda hill | बोल्डा टेकडीवर पकडले आरोपी

बोल्डा टेकडीवर पकडले आरोपी

हिंगोली/कळमनुरी : आदिलाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या रेल्वेवर पडलेल्या दरोड्यातील चार आरोपींना काही तासांतच बोल्डा टेकडीवर पकडण्यात कळमनुरी पोलिसांना यश आले. पूर्वनियोजित पद्धतीने दरोडा घालणारी ही टोळी वेगवेगळ्या ठिकाणच्या आरोपींनी एकत्र येऊन बनविली होती.
शनिवारी मध्यरात्रीच्या या घटनेबाबत राहुल राठोड (वय ३२, रा. पूर्णा) यांनी फिर्याद दिली. राठोड यांच्या पत्नीच्या गळ्यातील ८ ग्रॅम मनीमंगळसूत्र, फिर्यादीची भावजय कविता यांच्या अंगावरील दीड तोळ्याचे मनीमंगळसूत्र, मेव्हणी प्रतिभा राठोड यांच्या जवळील ८ ग्रॅम मंगळसूत्र, मेव्हण्याच्या खिशातील रोख ५ हजार तीनशे रुपये तसेच प्रवासी उत्पलचंद प्रेमदास थोरात यांचा ४ हजार ५०० रुपये किंंमतीचा मोबाईल, सचिन पोहेकर यांच्या जवळील १ हजार ६०० रुपयांचा मोबाईल नगदी ५ हजार, राम वाघमारे यांच्या जवळील ३ हजार, विजय सिंगणे यांचा मोबाईल व २ तोळे सोन्याची चेन, ७ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख १९ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटला. नांदापूर रेल्वे स्टेशन आल्यानंतर प्रवाशांनी ही माहिती स्टेशन मास्तरला सांगितले. त्यांनी ही माहिती हिंगोली पोलिस व नांदेड रेल्वे पोलिसांना दिली. जखमींना नांदापूर येथे रेल्वे स्टेशनवर प्रथमोपचार केल्यानंतर हिंगोलीतील सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. माहिती मिळताच हिंगोली कळमनुरी, बाळापूर, कुरूंदा आदी ठाण्यांचे पोलिस घटनास्थळी आल्यानंतर सर्वत्र नाकाबंदी केली. नाकाबंदीमुळे चार आरोपी बोल्डा शिवारातील जंगलात जाऊन लपले. दरम्यान पोलिस अधीक्षक एन. अंबिका यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी रात्रभर परिसर पिंजून काढला. बोल्डा टेकडीवर चार आरोपी लपले होते. पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिस उपअधीक्षक सुनील लांजेवार, निलेश मोरे, रविकांत सोनवणे, शंकर सिटीकर, विनायक लंबे, एन. एस. दीपक, शेख खुद्दूस, सुदाम जोगदंड, शेख मुजीब, गणेश राठोड, तय्यब अली, राजीव जाधव, नानाराव मस्के, गंगाधर मस्के, मुदीराज, शेषराव राठोड, बाभळे आदींनी सापळा रचला. सकाळी १०. ३० वाजेच्या सुमारास बोल्डा, नांदापूर, असोला, हरवाडी, म्हैसगव्हाण येथील ग्रामस्थांच्या मदतीने बोल्डा टेकडीवर लपून बसलेल्या चार दरोडेखोरांना ताब्यात घेऊन कळमनुरी ठाण्यात आणले. पोलिसांनी खाक्या दाखविताच चारही आरोपींनी गुन्हा कबूल केला. यामध्ये संदेश उर्फ शिवा पवार (वय २४, अकोला), शेख गफार (२२, परभणी), पिंगळ्या उर्फ मुंजाजी (२४, पूर्णा), शेख रफीक शेख चांद (२३, हडको, परभणी) अशी या चार आरोपींची नावे आहेत. या आरोपीवर ३ ते ४ दरोड्यांची गुन्हे दाखल असून दोघे फरार आहेत. एकूण सहाही आरोपीविरूद्ध नांदेड रेल्वे पोलिसांत कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वे फौजदार एच.एम. खान यांनी दिली.
(वार्ताहर)
रेल्वेची सुरक्षितता धोक्यात आल्याची चर्चा
नांदेड रेल्वे पोलीस विभागाअंतर्गत हिंगोली येथे चौकी आहे. या चौकीत पोलिस हवालदार प्रदीप गवळी, पोना संदीप पोपलवार, कैलास वाघ या तिघांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री दरोड्याची घटना घडली त्यावेळी तीन कर्मचाऱ्यांसोबत रेल्वे सुरक्षा बलाचे जवान एन. के. सूर्यवंशी हिंगोली येथे पोहोचले.
जवळपास आठ ते दहा वर्षांपूर्वी नॅनोगेज असताना मिनाक्षी एक्स्प्रेसवर दरोडा पडला होता. त्यावेळीही शस्त्रांचा धाक दाखवून रेल्वेत बरीच मोठी लूट झाली होती. रेल्वेगाडीत सुरक्षेसाठी पोलिस तैनात केले जात नसल्याने पुन्हा एकदा चोरट्यांनी धारिष्ट्य दाखविले.
पूर्णा-अकोला मार्गावरील सर्वच स्थानके असुरक्षित बनली आहेत. दोन दिवसांपूर्वी नांदापूर शिवारात रेल्वेवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्याबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सांगून रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हा लुटमारीचा प्रकार घडल्याचा आरोप एका प्रवाशाने केला. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांत प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले असून गाडीतील कर्मचारीही स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या स्थानिक पोलिसांनी गुन्हेगारांविरूद्ध कठोर भुमिका घेऊन स्थानकावरील चोऱ्या, गाडीत प्रवाशांना लुटण्याचे, मारहाणीचे प्रकार रोखावेत, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पूर्णा-अकोला मार्गावर रेल्वेमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून रात्रीच्या वेळीच असे प्रकार वारंवार घडत आहेत. परंतु त्याकडे रेल्वे पोलीस लक्ष देत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. यापुर्वीही प्रवाशांना मारहाण करीत लुटमारीचे अनेक प्रकार घडले आहेत.
किरकोळ प्रकार नेहमीच
या मार्गावरील अनेक स्टेशन विकसित नसून पोलिसबळही अपुरे आहे. याचा फायदा घेत रेल्वे प्रवाशांना अनेकदा किरकोळ लुटीच्या घटनांना सामोरे जावे लागते. फिर्याद घ्यायलाही कुणी नसल्याने स्थानकावर मदतीसाठी पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे अनेकदा तक्रारीही दाखल होत नाहीत.
ठराविक भागातच टोळ्या सक्रिय
या मार्गावर ठराविक भागात अशा टोळ्या सक्रिय आहेत. ज्या रात्रीच्या वेळी प्रवासी झोपेत असताना हात साफ करतात. ही बाब लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. त्यामुळे अशा तुरळक घटना सोडल्या तर कुणी नोंदही करीत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या टोळक्यांचा बंदोबस्तासाठी ेगाड्यांत पोलिस कुमक आवश्यक आहे.

Web Title: Accused arrested on Bollda hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.