प्रसंगावधानी विशेष पोलीस अधिका-यांनी वाचवले रेल्वेरूळावर झोपलेल्या रिक्षाचालकाचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 18:23 IST2017-10-14T18:18:46+5:302017-10-14T18:23:24+5:30

चार दिवसावर दिवाळीचा सण आला आणि आठ दिवसापासून रिक्षा चालवून रोजंदारीही निघत नसल्याने वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरूळावर झोपलेल्या रिक्षाचालकास वाचविण्यास विशेष पोलीस अधिका-यांना (एसपीओ)यश आले.

Accidental Special Police Officer saved the life of the rickshaw puller on the train | प्रसंगावधानी विशेष पोलीस अधिका-यांनी वाचवले रेल्वेरूळावर झोपलेल्या रिक्षाचालकाचे प्राण

प्रसंगावधानी विशेष पोलीस अधिका-यांनी वाचवले रेल्वेरूळावर झोपलेल्या रिक्षाचालकाचे प्राण

ठळक मुद्दे वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरूळावर झोपला होता रिक्षाचालक भविष्याची चिंता सतावत असल्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतल्याचे रिक्षाचालकाने सांगितले साडेअकरा वाजेच्या सुमारास एसपीओ श्रीमंत गोर्डे पाटील, अशोक सोजे यांच्या ते नजरेस पडताच त्यांनी रिक्षाचालकास रूळावरून उठवले

औरंगाबाद, दि.१४ : चार दिवसावर दिवाळीचा सण आला आणि आठ दिवसापासून रिक्षा चालवून रोजंदारीही निघत नसल्याने वैफल्यातून आत्महत्येसाठी रेल्वेरूळावर झोपलेल्या रिक्षाचालकास वाचविण्यास विशेष पोलीस अधिका-यांना (एसपीओ)यश आले. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली.

सुरेश नामदेव(वय ५०,रा.हनुमानगर, नावे बदलले आहे)हे रिक्षाचालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. एका मुलीचा विवाह झालेला आहे तर दुसरी नववीत शिकत आहे. मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेतो. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी जवळ दोन पैसेही नसल्याने ते रोज सकाळीच रिक्षा व्यवसायासाठी बाहेर नेत. नियमाप्रमाणे प्रवासी वाहतुक करण्यासाठी ते रिक्षा थांब्यावर थांबतात. मात्र गेल्या काही दिवसापासून बारा ते चौदा तास काम करूनही त्यांना म्हणावे तसे प्रवासी मिळत नव्हते. प्रवासी न मिळाल्याने त्यांना दैनंदिन रोजंदारीही काढणे दुर होत होते. त्यात त्यांची जुनी रिक्षा असल्याने त्यात नेहमी बिघाड होतो. रिक्षा दुरूस्तीवर पैसे खर्च करावे अथवा दैनंदिन घरखर्च भागवावा, या विवंचनेत ते होते.

एवढे कष्ट करूनही दोन पैसे शिल्लक राहत  नसल्याने ते निराश झाल्याने त्यांच्या पत्नीने त्यांची समजूत काढली. पत्नीने त्यांना हिम्मत दिली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास वृद्ध वडिलांना जेवू घातल्यानंतर ते घराबाहेर पडले. पुंडलिकनगर येथून ते चालत-चालत थेट संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली गेले. रात्री ११ वाजेच्या सुमारास ते रेल्वेरूळावर जाऊन झोपले. साडेअकरा वाजेच्या सुमारास एसपीओ श्रीमंत गोर्डे पाटील, अशोक सोजे यांना ते नजरेस पडले. त्यांनी त्यांना रूळावरून उठवून त्यांची विचापुस केली तेव्हा त्यांनी रिक्षाचा व्यवसाय होत नसल्याने आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरूळावर झोपल्याचे सांगितले. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भविष्याची चिंता सतावत असल्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यावेळी त्यांची गोर्डे पाटील,  अ‍ॅॅड. रामदास भोसले, नरेंद्र आडे, स्वराज गोर्डे, राहुल सोनकांबळे यांनी त्यांची समजूत आणि त्यांच्या साला आणि नातेवाईकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन केले.

रेल्वेसमोर उडी मारण्याची हिम्मत झाली नाही
तत्पूर्वी त्यांच्यासमोरून तीन रेल्वेगाड्या गेल्या. प्रत्येक गाडीसमोर उडी मारून जीवनयात्रा संपवावी,या उद्देशाने ते तिकडे गेले. परंतु रेल्वेसमोर उडी मारण्याची त्यांची हिम्मत झाली नाही. शेवटी त्यांनी रेल्वेरूळावर झोपण्याचा निर्णय घेतला.
 

Web Title: Accidental Special Police Officer saved the life of the rickshaw puller on the train