वाळूज महानगर : सिडको महानगर १, वाळूज येथील इंद्रधनू अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वृद्धाचा लिफ्टच्या बेसमेंटमधील जागेत मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, मृत सुभाष कडाजी गावंडे यांचा रविवारी वाढदिवस होता. याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास लिफ्टच्या खालून येणाऱ्या दुर्गंधीमुळे ही घटना उघडकीस आली.
सुभाष कडाजी गावंडे (वय ६१) हे शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाले. मुलगा स्वप्निल गावंडे यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. रविवारी रात्री लिफ्टच्या बेसमेंट भागातून कुबट वास येऊ लागला. अग्निशमन दलाच्या एल. जी. ब्राह्मणकर, आर. के. जात, डी. पी. पाटील, केतन पाटील, प्रथमेश नागरगोजे, पी. एस. काळे, पी. एस. खाडे यांनी शोधमोहीम सुरू केली असता लिफ्टच्या खालच्या डक्टमध्ये सुभाष यांचा मृतदेह सापडला.
पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. हा अपघात की घातपात, हे स्पष्ट झालेले नसून, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.