पीक कर्जासोबत अपघात विमा
By Admin | Updated: June 13, 2016 00:45 IST2016-06-13T00:34:20+5:302016-06-13T00:45:19+5:30
औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. हे पीक कर्ज देत

पीक कर्जासोबत अपघात विमा
औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर सध्या विविध बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे. हे पीक कर्ज देत असतानाच बँकेकडून संबंधित शेतकऱ्यांचा पन्नास हजार रुपयांचा अपघात विमाही उतरविला जात आहे, अशी माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक गंगाधर वाकडे यांनी दिली.
मराठवाड्यात सर्व प्रकारच्या बँकांना मिळून यंदा ९,८६३ कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिलेले आहे. आतापर्यंत त्यापैकी २५ टक्के म्हणजे अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षी विभागात १३ लाख ४१ हजार शेतकऱ्यांना एकूण ७,११० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले होते.
सध्या विभागातील आठही जिल्ह्यांत कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. पण हे पीक कर्ज देत असतानाच बँकांकडून शेतकऱ्यांचा अपघात विमाही उतरविला जात आहे. याविषयी माहिती लीड बँकेचे व्यवस्थापक गंगाधर वाकडे यांनी दिली. ते म्हणाले, पीक कर्ज देताना शेतकऱ्यांचा पन्नास हजार रुपयांचा अपघात विमा उतरविला जातो आहे. त्यासाठी शेतकऱ्याचे १५ रुपये आणि बँकेचे १५ रुपये असा ३० रुपये खर्च येतो. याशिवाय पीक कर्ज देताना पीक विमाही उतरविला जात आहे. शेतात किती क्षेत्रात कोणत्या पिकाची लागवड करणार याविषयी शेतकऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तेवढी रक्कम काढून घेतली जात आहे. नंतर ही पीक विम्यासाठी संबंधित बँक किंवा एजन्सीकडे जमा केली जाते.
गतवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर असा पीक विमा उतरविण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून यंदा मराठवाड्यासाठी पीक विम्याच्या भरपाईपोटी सुमारे ३ हजार कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. सध्या या रकमेचेही वाटप सुरू आहे. बँकांमधून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे. तसेच पीक विम्याच्या भरपाई रकमेतून जुन्या कर्जाचा हप्ता कापून घेऊ नका अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
खरिपासाठी सध्या राज्यभरात पीक कर्जाचे वाटप सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. या कर्ज वाटपात औरंगाबाद जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५९ टक्के इतके पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे, असेही वाकडे म्हणाले.