लाच स्वीकारताना पोलीस, लिपीक जाळ्यात

By Admin | Updated: January 6, 2017 00:19 IST2017-01-06T00:16:40+5:302017-01-06T00:19:16+5:30

लातूर : उदगीर आणि लातूर येथे गुरूवारी दुपारी वेगवेगळ्या घटनेत पोलीस कर्मचारी, लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे़

In accepting the bribe, the police and clerks are trapped | लाच स्वीकारताना पोलीस, लिपीक जाळ्यात

लाच स्वीकारताना पोलीस, लिपीक जाळ्यात

लातूर : उदगीर आणि लातूर येथे गुरूवारी दुपारी वेगवेगळ्या घटनेत पोलीस कर्मचारी, लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे़ याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाणे, शिवाजीनगर पोलीस ठाणे लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़
लातूर येथील घटनेत कनिष्ठ लिपीक विष्णू तुळशीदास काळे (३४) याने तक्रारदार व त्यांचे मित्र अशा दोघांनी मिळून अहमदपूर येथील एमआयडीसीत व्यवसायासाठी २०१६ मध्ये प्रत्येकी १८०० स्क्वे़ मीटर जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. जागेचा भाडेपट्टा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रारदाराने दस्त अभी निर्णयासाठी दाखल केला होता़ त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी भरून दस्त घेऊन तो एमआयडीसी कार्यालय लातूर येथे सादर करावयाचा होता़ सदर दस्तासाठी लागणारे चलन तक्रारदार व त्याच्या मित्राने प्रत्येकी ५ हजार १०० रूपये २ जानेवारी २०१७ रोजी स्टॅम्प ड्युटी भरणा केली होती़ जिल्हाधिकारी कार्यालयात चलन भरण्यात आलेली पावतीही जमा करून दस्त देण्याच्या कामासाठी कनिष्ठ लिपीक विष्णू तुळशीदास काळे याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़ तडजोडीपोटी ठरलेली लाच गुरूवारी दुपारी स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़
दुसऱ्या घटनेत उदगीर येथे तक्रारदाराकडून अटक वॉरंटमध्ये अटक न करण्याच्या कामासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार संग्राम सोळंके (वय ४८, शहर पोलीस ठाणे, उदगीर) याने अडीच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती़ दरम्यान, तडजोडीपोटी तक्रारदाराने दोन हजार रूपये देण्याचे मान्य केले़
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्याकडे तक्रार दाखल केली़ या तक्रारीची दखल घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बसस्थानक परिसरात गुरूवारी सापळा लावला़ दुपारी ४़३० वाजण्याच्या सुमारास तक्रारदारांकडून दोन हजार रूपयांची लाच घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार संग्राम सोळुंके याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी शहर पोलीस ठाणे उदगीर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे़ पथकात पोलीस निरीक्षक खंदारे, पो़नि़ दराडे, पोक़ॉ़ विष्णू गंडरे, शैलेश सुडे, मोहन सुरवसे, पो़ना़ चंद्रकांत डांगे, पोक़ॉ़ नानासाहेब भोंग, सचिन धारेकर, प्रदीप स्वामी, गोविंद जाधव आदींचा सहभाग होता़
या घटनेमुळे पोलीस वर्तुळ आणि महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे़

Web Title: In accepting the bribe, the police and clerks are trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.