परभणीत ३०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर
By Admin | Updated: August 24, 2014 00:33 IST2014-08-24T00:33:22+5:302014-08-24T00:33:22+5:30
परभणी :येथे स्वतंत्र स्त्री रुग्णालयासंदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, ३०० खाटांचे स्त्री रुग्णालय शहरासाठी मंजूर झाले आहे़

परभणीत ३०० खाटांचे स्त्री रुग्णालय मंजूर
परभणी :जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्याने परभणी येथे स्वतंत्र स्त्री रुग्णालयाची आवश्यकता होती़ गेल्या तीन वर्षांपासून या संदर्भात सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले असून, ३०० खाटांचे स्त्री रुग्णालय शहरासाठी मंजूर झाले आहे़
परभणी हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी परिसरातील मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात़ या रुग्णालयात चांगल्या सुविधा उपलब्ध असल्या तरी वाढणारी रुग्णांची संख्या लक्षात घेता स्वतंत्र स्त्री रुग्णालय असावे, अशी शहरवासियांची अपेक्षा होती़ त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या़ परभणी शहरातील शनिवार बाजार भागात यापूर्वी स्त्री रुग्णालय होणार होते़; परंतु, या रुग्णालयासंदर्भात तांत्रिक अडचणी उपस्थित झाल्याने या रुग्णालयाकरीता निश्चित केलेल्या इमारतीमध्ये नेत्र रुग्णालय उभारण्यात आले आहे़ या पार्श्वभूमीवर परभणी शहराकरीता आता दर्गारोड भागात कृत्रिम रेतन केंद्र परिसरात स्त्री रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ ३०० खाटांचे हे रुग्णालय राहणार असून, यासाठी २़५ एकर जागा आरोग्य विभागाला पशूसंवर्धन विभागाकडून हस्तांतरित करण्यात आली आहे़
अत्याधुनिक स्त्री रुग्णालय उभारण्याकरीता २५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता लागणार असून, पहिल्याच टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे़ महाराष्ट्रातील आरोग्य विभागांतर्गत अत्याधुनिक सुविधा असणारे हे एकमेव स्त्री रुग्णालय असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली़ या स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे भूमीपूजन २४ आॅगस्ट रोजी आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते होणार आहे़ (जिल्हा प्रतिनिधी)