शिवा ट्रस्टच्या फार्मसी कॉलेजला मान्यता द्या
By Admin | Updated: July 7, 2014 00:41 IST2014-07-07T00:24:42+5:302014-07-07T00:41:56+5:30
औरंगाबाद : शिवा ट्रस्ट संचालित राजेशभय्या टोपे कॉलेज आॅफ फार्मसी, निपाणी, भालगाव आणि वडाळा येथील प्रतिभाताई पवार कॉलेज आॅफ फार्मसी यांना पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता द्या.

शिवा ट्रस्टच्या फार्मसी कॉलेजला मान्यता द्या
औरंगाबाद : शिवा ट्रस्ट संचालित राजेशभय्या टोपे कॉलेज आॅफ फार्मसी, निपाणी, भालगाव आणि वडाळा (ता. श्रीरामपूर) येथील प्रतिभाताई पवार कॉलेज आॅफ फार्मसी यांना २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देऊन महाविद्यालयांची नावे संकेतस्थळावर टाका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही.एल. अचलिया यांनी राज्य शासनाला दिले.
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी सदर संस्थेने आॅल इंडिया तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) यांच्याकडे फार्मसी पदविका कॉलेज सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. एआयसीटीईने दोन्ही कॉलेजांना औषधनिर्माणशास्त्र प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली. वडाळा येथील कॉलेजसाठी १२० प्रवेश क्षमता, तर निपाणी येथील कॉलेजची प्रवेश क्षमता १८० अशी निश्चित करण्यात आली. त्याचप्रमाणे राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयानेही हा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी शिफारशीसह सादर केला. राज्य शासनाने बृहत आराखड्याच्या निकषांच्या आधारे दोन्ही संस्थांना मान्यता देण्यास नकार दिला. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी अॅड. व्ही.डी. होण यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल करून आव्हान दिले. याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, एआयसीटीई ही सर्वोच्च संस्था आहे. शासनाची केवळ नाममात्र मान्यता असते. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले. शासनाच्या वतीने सहायक सरकारी लोकअभियोक्ता एस.के. तांबे यांनी काम पाहिले.