अंगणवाडी भरती लाच प्रकरणी उमरीत ‘एसीबी’ने केली कर्मचाऱ्यांची चौकशी
By Admin | Updated: August 22, 2014 00:22 IST2014-08-21T00:19:10+5:302014-08-22T00:22:06+5:30
अंगणवाडी भरती लाच प्रकरणी उमरीत ‘एसीबी’ने केली कर्मचाऱ्यांची चौकशी

अंगणवाडी भरती लाच प्रकरणी उमरीत ‘एसीबी’ने केली कर्मचाऱ्यांची चौकशी
उमरी : येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शांता सुरेवाड यांना ३० हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. या प्रकरणी कार्यालयातील पर्यवेक्षिका व कारकून या सर्व कर्मचाऱ्यांची आज २० रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय कुलकर्णी, पोलिस जमादार सय्यद सादिक, पोलिस नायक महम्मद पठाण यांनी उमरीच्या बालविकास प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका व ईतर कर्मचारी आदींची स्वतंत्रपणे चौकशी केली. सदर लाच प्रकरणात तसेच भरती प्रक्रियेत या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभाग किंवा ईतर काही लेखी पुरावे याबाबत ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी तपास केला. ७ आॅगस्ट रोजी बळेगाव ता. उमरी येथील एका मदतनीस कर्मचारी भरती प्रकरणात नियुक्ती आदेश देण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना बालविकास प्रकल्प अधिकारी शांता अमृतराव सुरेवाड यांना एसीबीने रंगेहात पकडले होते. उमरी तालुक्यातील सिंधी गोळेगाव, बोथी, बळेगाव या विभागातून ३ अंगणवाडी सेविका, ८ मिनी अंगणवाडी सेविका व १४ मदतनीस अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया झाली. प्रारंभापासूनच ही भरती वादग्रस्त झाली अपात्र उमेदवारांना बोगस कागदपत्राआधारे पात्र ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या व अन्याय, पक्षपात होत असल्याच्या तक्रारी झाल्या. मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत भरती झाली. शेवटी एका उमेदवाराकडून ३० हजाराची लाच घेताना खुद्द प्रकल्प अधिकारी चतुर्भूज झाले. झालेली सर्वच भरती प्रक्रिया आता संशयास्पद असल्याच्या तक्रारी होत असून पुन्हा भरती करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शांता सुरेवाड यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)