मुबलक पाणी, ६१ रस्ते, सफारी पार्क...; नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगरला काय-काय मिळणार?

By मुजीब देवणीकर | Published: January 4, 2024 07:36 PM2024-01-04T19:36:23+5:302024-01-04T19:37:57+5:30

मागील दोन दशकांपासून शहर पाणीप्रश्नाला तोंड देत आहे. शहराची प्रतीक्षा १ मार्चपूर्वी संपणार आहे.

Abundant water, 61 roads, safari park, theatre; In the new year, what will the Municipality, Smart City give to the city? | मुबलक पाणी, ६१ रस्ते, सफारी पार्क...; नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगरला काय-काय मिळणार?

मुबलक पाणी, ६१ रस्ते, सफारी पार्क...; नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगरला काय-काय मिळणार?

छत्रपती संभाजीनगर : महापालिका २०२४ मध्ये शहराला काही मोठे प्रकल्प देणार आहे. यामध्ये ९०० मिमी जलवाहिनीद्वारे तब्बल ७० एमएलडी अतिरिक्त पाणी, १०० कोटींतून ६१ सिमेंटचे गुळगुळीत रस्ते, २०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले सफारी पार्क, सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृह, खाऊ गल्ली, टीव्ही सेंटरला ग्लो गार्डन, सातारा-देवळाईत १०० टक्के ड्रेनेजलाइन, नवीन वसाहतींमध्ये जलवाहिन्यांचे जाळे टाकण्यात येईल. नवीन वर्ष शहराच्या विकासाला गती देणारे असेल, हे निश्चित.

महापालिका, स्मार्ट सिटी प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या सहकार्याने शहरात मोठ्या विकासकामांची पायाभरणी काही महिन्यांपासून सुरू होती. २०२४ मध्ये या विकासकामांवर फक्त कळस चढविण्याचे काम बाकी राहणार आहे. शहरातील १८ लाख नागरिक, पर्यटक डोळ्यासमोर ठेवून काही प्रकल्पाची आखणी केली आहे.

७० एमएलडी पाणी
मागील दोन दशकांपासून शहर पाणीप्रश्नाला तोंड देत आहे. शहराची प्रतीक्षा १ मार्चपूर्वी संपणार आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. मोठ्या अश्वशक्तीचे पंप आणून बसविणे इ. फुटकळ कामे बाकी आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत शहरात ७० एमएमलडी अतिरिक्त पाणी आल्यास नागरिकांना दोन दिवसांआड मुबलक पाणी मिळणार आहे. ज्या वसाहतींमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत, त्यांना हे पाणी मिळणार नाही.

१०० कोटींचे रस्ते
शहरातील ६१ रस्ते गुळगुळीत करण्यासाठी वारंवार शासन निधीसाठी प्रयत्न केले. शासन अनुदान काही मिळाले नाही. शेवटी मनपा निधीतून ही कामे सुरू करण्यात आली. पुढील चार ते पाच महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासोबतच स्मार्ट सिटीच्या माध्यमाने सुरू केलेले १०१ रस्त्यांपैकी ७० रस्ते पूर्ण झाले. उर्वरित ३१ रस्ते पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा मनोदय आहे.

मिटमिट्यात सफारी पार्क
मिटमिटा येथे १०० हेक्टर जागेवर जवळपास २०० कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीमार्फत भव्य सफारी पार्क उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. एप्रिलअखेर सर्व कामे पूर्ण होतील. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी घेऊन सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय स्थलांतरित केले जाईल. या ठिकाणी प्राण्यांची संख्या चारपटींनी वाढणार आहे. मराठवाड्यातील हे सर्वात मोठे पार्क राहील.

सातारा-देवळाईत ड्रेनेज लाइन
सातारा-देवळाईला ड्रेनेज १९३ कोटी रुपये खर्च करून सातारा-देवळाईत ड्रेनेज लाइन टाकण्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. २०२४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. शोषखड्डेमुक्त हा परिसर होईल.

संत तुकाराम नाट्यगृह
स्मार्ट सिटीच्या माध्यमाने सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहाच्या डागडुजीवर जवळपास ११ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मार्चपूर्वी नाट्यगृहाचे लोकार्पण केले जाणार आहे.

खाऊगल्ली, ग्लो गार्डन
सिडको एन-८ रोडवर आगळ्यावेगळ्या पदार्थांसह खाऊ गल्ली उभारणीचे काम सुरू झाले. बॉटनिकल गार्डन येथे नौकाविहारही सुरू केला जात आहे. त्याचप्रमाणे टीव्ही सेंटर येथे ग्लो गार्डन पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे.

Web Title: Abundant water, 61 roads, safari park, theatre; In the new year, what will the Municipality, Smart City give to the city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.