टेंडर नसतानाही कंत्राटदाराची महापालिकेवर ‘दौलत जादा’
By Admin | Updated: August 23, 2015 00:01 IST2015-08-22T23:47:49+5:302015-08-23T00:01:16+5:30
दत्ता थोरे/ आशपाक पठाण , लातूर महापालिकेच्या विकास कामात नियोजनाच्या अभावामुळे कसा ‘तमाशा’ झाला याचे बिंग ‘लोकमत’च्या स्टींगमधून बाहेर आले आहे़ कोणाची परवानगी नाही,

टेंडर नसतानाही कंत्राटदाराची महापालिकेवर ‘दौलत जादा’
दत्ता थोरे/ आशपाक पठाण , लातूर
महापालिकेच्या विकास कामात नियोजनाच्या अभावामुळे कसा ‘तमाशा’ झाला याचे बिंग ‘लोकमत’च्या स्टींगमधून बाहेर आले आहे़ कोणाची परवानगी नाही, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण नाहीतरीही एका बहाद्दर कंत्राटदाराने लातूर मनपावर आपली ‘दौलत जादा’ केली आहे़ महापालिकेवर भलताच मेहरबान झालेल्या या कंत्राटदाराने टेंडर मंजूर व्हायच्या आधिच विकासकामांचा धडाका लावला असून, आदर्श कॉलनी नजिक नाल्याच्या कामाचा शुभारंभ केला आहे़ भविष्यात हे टेंडर आपल्यालाच मिळेल, याची खात्री नसतानाही हे काम बिनदिक्कतपणे सुरू आहे़ हे मनपातील अधिकाऱ्यांच्या ‘अर्थपूर्ण’ मनोमिलनातून की लातूर मनपा कंत्राटदारावर फिदा झाल्याने असा प्रश्न निर्माण झाला आहे़
औसा रोडवरील प्रभाग क्ऱ २१ मध्ये असलेल्या मुख्य रस्त्यालगत आदर्श कॉलनीपासून साईबाबा भाजी स्टॉल ते दत्तमंदीर गेट व पुढे गंगा स्विट होमपर्यंत गटारीचे काम करण्यासाठी मनपाच्या बांधकाम विभागाने २० आॅगस्ट रोजी आॅनलाईन निविदा काढली आहे़ या कामासाठी निविदा दाखल करण्याची शेवटची तारीख २६ आॅगस्ट आहे़ अद्याप या कामासाठी निविदाच दाखल झालेली नसताना एका कंत्राटदाराने काम बिनधास्तपणे सुरू केले आहे़ गेल्या तीन दिवसांपासून सदरील काम सुरू आहे़ निविदा मंजूर नसतानाही सुरू असलेल्या कामाचे ‘लोकमत’ने शनिवारी स्टींग आॅपरेशन केले़ एकीकडे पाणी नसल्याने खाजगी बांधकामे थांबविण्यात आली़ तर दुसरीकडे मोठ्या कंत्राटदारांचे मजूर बसून राहू नयेत म्हणून त्यांची कामे मात्र बिनबोभाट सुरू आहेत़ प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यात असलेल्या संबंधामुळे मनपात ‘रोखी’च्या कामात मागे पुढे पाहिले जात नाही़ काम सुरू झाले कधी अन् संपले कधी याचा पत्ताही अनेकदा प्रशासनाला नसतो़ संबंधित कंत्राटदार बिल काढण्यासाठी आल्यावरच त्याची चर्चा होते़ त्यामुळे कामांची गुणवत्ता तपासण्याचा विषयच येत नाही़ नेहमीच अपुरे मनुष्यबळ असल्याचा कांगावा प्रशासन करीत असते़ परंतू, आहे त्या मनुष्यबळावर साधी कामांची गुणवत्ताही तपासली जात नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे़
शहरात तीव्र पाणीटंचाई आहे़ त्यामुळे सर्वप्रकारची बांधकामे तात्काळ थांबविण्याचे आदेश स्वत: मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी टंचाई निवारणासाठी घेण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत संबंधित विभागाला दिले़ त्यामुळे त्याची अंमलबजावणीही सुरू झाली़ कामात सतर्क असलेल्या कर्मचाऱ्यांनी अगदी गल्लीबोळातही लक्ष घातले़ अन् किरकोळ घरांची डागडुजी असलेलीही कामे बंद केली़ एकीकडे घरगुती कामे बंद करून प्रशासनाने आपली पाठ थोपटून घेतली़ मात्र, मनपा हद्दीत सुरू असलेली शासकीय कामे थांबवावीत, असे कोणालाही वाटले नाही़ शुक्रवारपर्यंत खाडगाव रोड भागात एका मोठ्या कंत्राटदाराचे गटारीचे काम सुरूच होते़ यांना पाणीटंचाई नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
म्हणे लोकांचा आग्रह़़़
४यासंदर्भात कंत्राटदाराला विचारणा केली असता तेथील नागरिकांच्या आग्रहास्तव काम सुरू केले होते़ कामाची वर्कआॅर्डरही नाही़ आयुक्तांनी काम बंद करा म्हणून शनिवारी सांगितले असता आम्ही काम बंद केले असल्याचे त्यांनी सांगितले़
आदर्श कॉलनी भागातील या गटारीच्या कामाची निविदा आॅनलाईन आहे़ २६ आॅगस्टपर्यंत निविदा दाखल करावयची असताना २१ रोजी काम सुरू झाले आहे़ हा प्रकार मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांना काही नागरिकांनी लक्षात आणून दिला होता़ कंत्राटदारला काम कोणी सुरू करायला लावले? निविदा मंजूर नसतानाही काम कसे सुरू झाले, असे प्रकार नेहमीचेच आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ कंत्राटदार तर स्वत:हून काम सुरू करणार नाही, त्याला काम सुरू करण्याचे आदेश दिले कोण, हा खरा प्रश्न आहे़ याप्रकरणी आयुक्त सुधाकर तेलंग यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही़
‘त्यांच्या’ मजुराची मनपाला काळजी़़़
४लातूर शहरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू असलेल्या एका कंत्राटदाराकडे मजुरांची संख्या मोठी आहे़ महिनाभरपासून मनपा प्रशासनाने खाजगी बांधकामे तात्काळ बंद करावीत, असे संबंधितांना बजावले़ त्यानुसार कामेही बंद झाली़ परिणामी, हजारो लोकांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली़ तर दुसरीकडे मात्र मोठ्या कंत्राटदारांचे मजूर बसून राहू नयेत, याची तसदीच मनपा प्रशासनाने घेतली़ २० आॅगस्टपर्यंत गटारीचे काम सुरूच होते़ या कामांकडे एकाही अधिकाऱ्यांने लक्ष दिले नाही़ यातून आयुक्तांसह बांधकाम विभागाची सजगता लक्षात येत आहे़