चाऱ्याअभावी महिन्यात
By Admin | Updated: November 23, 2014 00:24 IST2014-11-23T00:13:33+5:302014-11-23T00:24:20+5:30
एम.जी. मोमीन , जळकोट जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा गाव व परिसरात महिनाभरात १६ जनावरांचा चाऱ्याअभावी मृत्यू झाला असून, आणखी अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या मार्गावर आहेत

चाऱ्याअभावी महिन्यात
एम.जी. मोमीन , जळकोट
जळकोट तालुक्यातील शिवाजीनगर तांडा गाव व परिसरात महिनाभरात १६ जनावरांचा चाऱ्याअभावी मृत्यू झाला असून, आणखी अनेक जनावरे मृत्युमुखी पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाने दखल घेऊन नुकसान झालेल्या पशुधनाची भरपाई द्यावी. तात्काळ चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी पशुपालक तुळशीराम जाधव, विश्वास आडे, बाबूराव सोनकांबळे यांच्यासह बंजारा समाजबांधवांनी केली आहे.
या घटनेमुळे जळकोट तालुक्यातील आसपासच्या २० ते २५ वाडी-तांड्यांवर पशुधनाचे असेच हाल होत असल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर तांडा येथे एक हजार जनावरे असून, येथील चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कडबा, गवत या चाऱ्याऐवजी झाडपाला तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याबरोबरच इतर ठिकाणचेही पशुधन चाऱ्याअभावी अशक्त व भाकड झाली आहेत. त्यामुळे ही जनावरेही दगावण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे तुळशीराम जाधव व विश्वनाथ आडे यांनी सांगितले.
बंजारा समाजाचा मूळ व पारंपारिक व्यवसाय पशुधन जगविण्याचा आहे. शेतकऱ्यांकडील जनावरे आर्धालीच्या बोलीने राखली जातात. प्रत्येक कुटुंबाकडे ६० ते ७० जनावरे असतात. यावर्षी तालुक्यात ३५० मि.मी. पाऊस झाल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. दुर्मिळ असणाऱ्या कडब्याच्या पेंढीचा भावही २० रुपयांवर गेला आहे. शेतकऱ्यांना व बंजारा समाजाच्या बांधवांना महागामोलाचा कडबा विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे अनेक जनावरे भाकड होऊन दगावत आहेत. तर शेकडो जनावरे मातीमोल दराने विक्री केल्याने त्या पशुधनावर कत्तलखान्याकडे पाठविण्याची वेळ आली आहे.
जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, माळहिप्परगा, चितलंगी तांडा, फकरु तांडा, पोमा तांडा, चतुरा तांडा, अतनूर तांडा, अग्रवाल तांडा, भवानीनगर तांडा, मरसांगवी तांडा, जळकोट तांडा, गुत्ती तांडा, फटकडी तांडा, बालाजीवाडी तांडा आदी ठिकाणच्या पशुधनाचे चाऱ्याअभावी बेहाल होत आहेत. माळरानात चाऱ्याचा शोध घेत आहेत. तर पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ या पशुधनावर आली आहे. यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने पशुपालकांना आपले पशुधन सांभाळावे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.